Satara Crime: घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक; शिरवळ पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 04:21 PM2023-01-27T16:21:56+5:302023-01-27T16:24:50+5:30
३६ तास तपास
मुराद पटेल
शिरवळ : शिरवळ येथील घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आवळल्या. संबंधितांकडून १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील पंढरपूर फाटा येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद शिरवळ पोलिस ठाण्यात २९ डिसेंबरला दाखल झाली होती. त्यानुसार पोलिस पथक तपास करीत होते.
शिरवळ याठिकाणी वास्तव्यास असलेला सराईत गुन्हेगार रामा दादा मंडलिक (वय २०, मूळ रा. जामखेड जि. अहमदनगर) याच्यासह आणखी दोघांचा समावेश असल्याचे शिरवळ पोलिसांना गोपनीय माहिती व तांत्रिक मुद्यांच्या आधारावर निष्पन्न झाले. दरम्यान, पिंपरी चिंचवड येथील अक्षय दशरथ शिंदे (22, रा. पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड) याला पिंपरी चिंचवड क्राइम युनिट 2 च्या सहकार्याने ताब्यात घेतले. यात वैभव दादाराव बनसोडे (२८, मूळ रा. तेलगाव सिना, जि. सोलापूर, सध्या रा. शिरवळ) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वैभव बनसोडे याला ताब्यात घेत त्याच्याजवळील १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानुसार रामा मंडलिक, अक्षय शिंदे, वैभव बनसोडे यांना अटक केली.
संबंधितांची पोलिस कोठडी संपल्यानंतर खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार करीत आहेत.
३६ तास तपास
घरफोडी टोळीचा पर्दाफाश करताना शिरवळ पोलिसांनी अथक परिश्रम करीत सलग ३६ तास तपास करीत पुणे, पिंपरी-चिंचवड ते सोलापूर जिल्हा अशी मोहीम राबवीत चोरट्यांना अटक केली.