खंडाळा एमआयडीसी टप्पा तीनसाठी शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:57+5:302021-02-05T09:05:57+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संमतीधारक शेतकऱ्यांचे सलग क्षेत्र ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संमतीधारक शेतकऱ्यांचे सलग क्षेत्र अधिग्रहीत करून त्याचा मोबदला त्वरित वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे या टप्प्यातील जमिनीवरील शिक्के उठवले असले तरी उर्वरित क्षेत्रात औद्योगिकीकरणाचा विस्तार होणार आहे.
औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यातील जमीन संपादनासाठी खंडाळा तहसील कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांसमवेत एक बैठक घेण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे कोल्हापूर विभागीय अधिकारी धनाजी इंगळे, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील मोर्वे, भादे, अहिरे, बावडा, म्हावशी, खंडाळा या गावांमधील शेतजमीन एमआयडीसी टप्पा क्रमांक तीनसाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही सुरू होती. मात्र, तालुक्यातील शेतकऱ्यांचा या गोष्टींसाठी सातत्याने विरोध होता. त्यामुळे काही गावांतील क्षेत्र वगळण्यात आले आहे. मात्र, शिवाजीनगर, भादे येथील ज्या शेतकऱ्यांची संमती आहे त्यांचे क्षेत्र घेण्याबाबत शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रातील एकाच गटातील आणेवारी निश्चित नाही. तरीही एमआयडीसीला व्यवहार केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला.
त्यासाठी आणेवारी दुरुस्ती करूनच मोबदला दिला जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बागायत केले आहे त्या क्षेत्राऐवजी बदली जमीन मिळावी, अशी मागणी केली. याबाबत संबंधित खातेदारांनी बदली क्षेत्र निदर्शनास आणून दिले तर त्यात सहकार्य केले जाईल. औद्योगिक वसाहतीला आवश्यक सलग क्षेत्र मिळविण्यासाठी भूसंपादन मंडळाचे प्रयत्न सुरू असून ज्या क्रमाने गटाचे संपादन होईल त्यानुसार भूसंपादित जमिनीचा मोबदला वाटप करण्यात येणार आहे. याबाबतीत शेतकऱ्यांच्या अन्य काही अडचणी असतील तर त्या मांडा. त्यावर मार्ग काढून संपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.