जिल्हा नियोजनमधील निवडीकडे इच्छुकांच्या नजरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:04+5:302021-07-07T04:49:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येऊन सव्वा वर्ष उलटले तरी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या ...

Interested eyes on district planning choices! | जिल्हा नियोजनमधील निवडीकडे इच्छुकांच्या नजरा!

जिल्हा नियोजनमधील निवडीकडे इच्छुकांच्या नजरा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येऊन सव्वा वर्ष उलटले तरी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या निमंत्रित सदस्यांना अजून सामावून घेतलेले नाही. या निवडी होण्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. कोरोना महामारीमुळे या निवडी रखडल्याचे बोलले जाते.

जिल्हा नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्यासोबतच सत्ताधारी पक्षांच्या इच्छुक कार्यकर्त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून सामावून घेतले जात असते. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना काहीशी उशिराच निमंत्रित सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. आता तीच पद्धत महाविकास आघाडीनेसुद्धा अवलंबलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेलेल्या सदस्यांपैकी काहींची नियोजन समितीवर वर्णी लागते; परंतु जे सदस्य पक्षासाठी काम करतात, त्यांना मात्र कुठलेच पद नसते आणि निधीपण नसतो, त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर घेतले जाते. या सदस्यांनी सुचवलेल्या विकासकामांना देखील यानिमित्ताने चालना मिळत असते.

या विकासकामांच्या निमित्ताने पक्षाची चांगली प्रतिमा मतदारांमध्ये पोचवता येते तसेच त्याचा फायदा भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घेता येतो. आता आगामी काळामध्ये जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी या निवडी झाल्या तर पक्षांना राजकीय फायदा उठवणे सोपे जाणार आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे याबाबत एकमत झाल्याचे पाहायला मिळत नाही. साताऱ्यामध्ये महाविकास आघाडी या नेत्यांमध्ये एकमत झाले नाही, असेच या निमित्ताने पुढे येते.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या वतीने जिल्हा नियोजन समितीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची नावे शासनाला कळवली आहेत. या निवडी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच निघणार आहेत तरीदेखील निवडीमुळे अनेक इच्छुक नाराज होऊ शकतात हीदेखील बाजू आहे. आगामी निवडणुकांच्या आधीच या निवडी घोषित होण्याची शक्‍यता आहे.

असा आहे फार्म्युला..

महाविकास आघाडीच्या फार्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे पालकमंत्री जिल्ह्यात आहेत, त्या पक्षाला ६० टक्के जागा तर इतर दोन सहकारी पक्षांना प्रत्येकी २० टक्के जागा वाट्याला येत आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे निमंत्रित सदस्यांच्या १० जागा या राष्ट्रवादीच्या वाट्याला, तर प्रत्येकी ४ काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना मिळणार आहेत.

निमंत्रित सदस्यांचे असे असेल बलाबल

राष्ट्रवादी १०

शिवसेना ४

काँग्रेस ४

कोट..

जिल्ह्यातील विविध १३ समित्यांमध्ये ज्या निवडी करायच्या आहेत, त्या इच्छुक सदस्यांची नावे पक्षाला कळवलेली आहेत. यावर लवकरच निर्णय होईल.

- नितीन बानुगडे पाटील, उपनेते शिवसेना

कोट..

जिल्हा नियोजन समिती सदस्यांची यादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. वित्त विभागाची यावर सही झाली असून, मुख्यमंत्र्यांकडे अंतिम आदेशासाठी यादी पाठवली गेली आहे.

- सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

कोट..

काँग्रेसच्या वाट्याला जिल्हा नियोजन समितीच्या चार जागा येणार आहेत. मागील काळात सत्ता नसल्याने काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेसच्या इच्छुकांची यादी जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे.

- डॉ. सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष काँग्रेस

Web Title: Interested eyes on district planning choices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.