Satara- आंतरराष्ट्रीय संरक्षित असलेले ‘स्टार कासव’ आढळले कऱ्हाडात, तस्करीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:29 PM2023-09-18T12:29:44+5:302023-09-18T12:35:51+5:30
वनविभागाने घेतले ताब्यात
कऱ्हाड : आंतरराष्ट्रीय स्तरावर खरेदी-विक्रीसह पाळण्यास बंदी असलेले स्टार कासव कऱ्हाड शहरात शनिवारी रात्री बेवारस आढळून आले. कोणीतरी मुद्दामहून ते कासव बेवारस स्थितीत सोडल्याची शक्यता असून, तस्करीचा संशय वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कासव वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रविवार पेठेत असलेल्या काझीवाडा येथे एक दुर्मीळ कासव असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन त्या कासवाला ताब्यात घेतले. तसेच याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनक्षेत्रपाल कऱ्हाड तुषार नवले, वनरक्षक कैलास सानप यांनी त्याठिकाणी भेट देत कासव ताब्यात घेतले.
संबंधित भारतीय स्टार कासव ही एक दुर्मीळ प्रजाती असून, या प्रजातीस कोरडे, रेताड, खडकाळ हवामान लागते. गवत, फळे, फूल आणि झाडांची पाने हा त्यांचा आहार असतो. हे कासव प्रामुख्याने गुजरातमधील कच्छ, राजस्थान, ओडिसा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी आढळते. हे कासव पाळणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार प्रतिबंधित आहे.
कऱ्हाडात हे कासव कोणी आणले, याबाबतचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. तस्करीच्या माध्यमातून ते आणण्यात आले असावे, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यानुसार त्याचा तपास केला जात आहे. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून संबंधित स्टार कासवाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे.
सात वर्ष कारावासाची तरतूद
स्टार कासव ही प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार शेड्यूल १ भाग ‘क’मध्ये समाविष्ट आहे. याची विक्री करणे, पाळणे, शिकार करणे याला कायद्यात १० हजार रुपये दंड व सात वर्ष कारावास अशा शिक्षेची तरतूद आहे.
स्टार कासवांच्या खरेदी-विक्रीच्या अवैध व्यवहारातील काळी बाजू म्हणजे हे कासव लहान असेपर्यंत घरात ठेवले जाते. अनेकदा ते मोठे झाले की, घराबाहेर पाणथळ जागी सोडून दिले जाते. एवढेच नाही तर पेट शॉपच्या बाहेरही कासवे सोडून दिलेली आढळली आहेत. स्टार कासव पाळणे, बाळगणे आणि विक्री हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. -रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो
स्टार कासवाचे वैशिष्ट्य
- स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर आकृती असते.
- हे चित्र पिरॅमिडसारखे दिसते. त्याचे सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात.
- स्टार कासवाच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी जाहीर झाली आहे.
- स्टार कासव हा वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी आहे.