..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:08 IST2025-02-28T12:07:20+5:302025-02-28T12:08:02+5:30
सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार ...

..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ
सातारा : शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणाऱ्या उंब्रज येथील विद्यार्थिनी नीलम शिंदे हिचा अपघात झाला. अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या नीलमच्या रक्तातील नातेवाइकांना व्हिसा मिळत नसल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांना आता मेलद्वारे शुक्रवारी सकाळी ९ वाजता काउंसिल ऑफिसला बोलावणे आले आहे. त्यामुळे नातेवाइकांचा अमेरिकेला जाण्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेत एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, स्थानिक पातळीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनासही बाब आणून दिली. गुरुवारी ही बातमी विविध माध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर यंत्रणा गतिमान झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत आवाज उठविल्यानंतर कुटुंबीयांना व्हिसासाठी बोलावण्यात आले आहे. व्हिसाचे काम झाल्यास नीलमचे वडील तानाजी शिंदे व मामा संजय कदम यांचा मुलगा गौरव कदम अमेरिकेला जाणार आहेत.
मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळविण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत होतो. यात डाॅ. अतुल भोसले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याही संपर्कात होतो. मात्र, गुरुवारी प्रसारमाध्यमांतून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच प्रक्रिया गतिमान झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून तर खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियावरून आवाज उठविल्याने व्हिसासाठी बोलावणे आले. - संजय कदम, नीलमचे मामा