साताऱ्यात 'या' ठिकाणी कोसळतोय 'उलटा धबधबा'; पर्यटकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 04:42 PM2022-07-09T16:42:09+5:302022-07-09T16:45:18+5:30
कास, ठोसेघर, कोयने पाठोपाठ हा उलटा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी
हणमंत यादव
चाफळ : निसर्गाची मुक्त उधळण केलेल्या चाफळ विभागातील सडावाघापुर जवळील उलटा धबधबा ( रिव्हर्स पॉईंट ) परिसरात पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडली आहे. हे निसर्ग सौंदर्य व धबधबा पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीची चांगली सोय असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी होत असल्याने पोलीस व वनविभागाची करडी नजर आहे.
चाफळच्या पश्चीमेस उंच डोंगर पठारावर सडावाघापुर हे गाव पाटण तारळे रस्त्यावर वसले आहे. या गावापासुन काही अंतरावर सध्या पर्यटकांना खुणवणारा उलटा धबधबा हे ठिकाण आहे. उंब्रज चाफळ - दाढोली मार्गेही या ठिकाणाकडे जाण्यास पक्या स्वरुपाचा डांबरीकरण रस्ता आहे. कास, ठोसेघर, कोयने पाठोपाठ हा उलटा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करु लागले आहेत. येथील निसर्गरम्य परिसर, उंच पनवचक्या व दाट धुक्याची पांझर घालत हिरवाईने फुललेला हा परिसर पर्यटकांना खुणवू लागला आहे.
गत दोन वर्षे कोरोना महामारीत बंद असलेला हा परिसर यावर्षी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रिमझिम पावसात भिजत पर्यटक या पर्यटन पंढरीचा आस्वाद घेत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या पाहता स्थानिक ग्रामस्थांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. तर, हुलडबाज पर्यटकांना चाप बसावा परिसरात शांतता राहावी यासाठी ठोस कारवाई करण्यात येत आहे.
सडावाघापूर गावच्या परिसरातील उलटा धबधबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद जरुर घ्यावा. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग करु नये. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. - अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक