Satara: कऱ्हाडमधील ‘त्या’ स्फोटाचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास करा, आमदार नितेश राणेंची मागणी
By दीपक शिंदे | Published: November 8, 2023 05:50 PM2023-11-08T17:50:23+5:302023-11-08T17:52:41+5:30
सातारा -कऱ्हाड भागात पीएफआयच्या हालचाली वाढत चालल्या
कऱ्हाड : कऱ्हाड येथे एका घरात २५ ऑक्टोबर रोजी झालेला स्फोट हा कोणत्याही अंगाने सिलिंडरचा स्फोट वाटत नाही. तेथे प्रत्यक्ष बॉम्ब बनवले जात असताना त्याला गॅस सिलिंडर स्फोट दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्याचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास झाला पाहिजे,’ अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.
कऱ्हाड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सागर आमले, राहुल यादव, शैलैंद्र गोंदकर यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘ज्या ठिकाणी कऱ्हाडात तो स्फोट झाला आहे, त्या ठिकाणी मी भेट दिली. शेजारील लोकांशी बातचीत केली. माहिती घेतली, त्यामुळे कोणतेही अंगाने तो गॅसचा स्फोट वाटत नाही, असा मला विश्वास आहे. घटनास्थळी सापडलेली केमिकल्स, झालेल्या स्फोटाची तीव्रता, त्यात झालेले नुकसान हे सर्व पाहता कोणाच्याही मनात शंका निर्माण होईल, अशी तिथली परिस्थिती आहे. मात्र, पोलिस यंत्रणा नेमक्या कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, हे कळत नाही. त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आडाखे बांधले आहेत, हेही समजत नाही.
सातारा -कऱ्हाड भागात पीएफआयच्या हालचाली वाढत चालल्या आहेत. मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. साताऱ्यात व्हॉट्सॲप ग्रुपवर पाकिस्तानचे नंबर सापडत आहेत. पाकिस्तानमधून तेथील लोकांना धमकीचे फोन येत आहेत. या सगळ्या बाबी गंभीर आहेत; परंतु कऱ्हाडच्या स्फोटाबाबत पोलिस यंत्रणेवर नेमका कोणाचा दबाव आहे? जिल्हा पोलिस प्रमुख नेमके कोणाला संरक्षण देऊ पाहत आहेत? सरकारची व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे? याचा आम्ही शोध घेतला असून, हिवाळी अधिवेशनात याबाबतची लक्षवेधी टाकणार आहे. तसेच, इथली वस्तुस्थिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या तत्काळ कानावर घालणार आहे.’
माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगाच मोठा ड्रग्ज माफिया..
ड्रग्ज माफिया अलवेश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आरतीला होता. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा तर सगळ्यात मोठा ड्रग्ज माफिया आहे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, असे म्हणत त्यांनी मोठा आरोप केला.
श्रावण बाळ आहे, तर ५० कोटींची ऑफर कशाला?
दिशा सालियन यांची दुर्दैवी घटना घडली तेव्हा आदित्य ठाकरे यांचे व तिचे मोबाइल टॉवर लोकेशन एकाच ठिकाणी आले आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांना अटक होऊ शकते. ती टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. तसेच, तक्रारदाराला त्यांच्या वडिलांकडून तक्रार मागे घेण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिल्याचेही समोर आले आहे. मुलगा श्रावण बाळ आहे, तर ५० कोटींची ऑफर कशाला, असा सवालही राणे यांनी यावेळी केला.