रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:24+5:302021-04-17T04:39:24+5:30
सातारा : शाहूपुरी येथील घोरपडे घर ते देशपांडे मारूती मंदिर रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून, त्याबाबत चौकशी करून तातडीने ...
सातारा : शाहूपुरी येथील घोरपडे घर ते देशपांडे मारूती मंदिर रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून, त्याबाबत चौकशी करून तातडीने हे काम दर्जेदार करण्याची मागणी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे नवनाथ जाधव व शोभा केंडे यांनी केली आहे.
याबाबत पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घोरपडे घर ते देशपांडे मारूती मंदिर रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असून, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्याची वायर ब्रशने जी साफसफाई काम सुरू करण्यापूर्वी करायची असते ती न करता तसेच कोणत्याही पद्धतीचा प्राथमिक डांबराचा थर न देता थेट खडी पसरण्याचे काम सुरू आहे. आवश्यक त्या ठिकाणी रस्ता क्राॅस पाइपचे प्रोव्हिजन केलेले नाही. या बाबी अत्यंत चुकीच्या असून, या सर्व बाबी आम्ही या विभागाचे माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याने तत्काळ नगरपालिकेचे अधिकारी चिद्रे यांना दूरध्वनीवरून कल्पनाही दिली. त्यांनी तत्काळ सदर कामावर भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करून वरील सर्व चुकांची शहानिशा करून मान्य केल्या. संबंधित ठेकेदारास या चुका सुधारण्यासाठी आदेश देतो, असे आश्वासन दिले आहे. तरीही आमची आपणाकडे अशी मागणी आहे की, सदरच्या ठेकेदारास कसल्याही परिस्थितीत पाठीशी न घालता, शाहूपुरी भागातील इतर कामांबाबतही अशीच निष्काळजी दाखवली असल्याचे आमचे मत आहे. केलेल्या सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून या कामातील तसेच अन्य कामामध्ये जे तांत्रिक दोष आढळतील त्या अनुषंगाने त्या ठेकेदारावर शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करावी.