पानसरे हल्लाप्रकरणी कऱ्हाडात तपास
By admin | Published: February 18, 2015 01:06 AM2015-02-18T01:06:08+5:302015-02-18T01:06:08+5:30
गोळीबार प्रकरणाचा तपासाठी विशेष पथक
कऱ्हाड : कोल्हापूर येथे कॉ. गोविंदराव पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक मंगळवारी कऱ्हाडात दाखल झाले आहे. या पथकाकडून शस्त्राशी संबंधित यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे. हा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे.
कोल्हापूर येथे सोमवारी पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. विशेष पथकांकडून या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. ठिकठिकाणी ही पथके तळ ठोकून आहेत. मंगळवारी एक तपास पथक कऱ्हाडात दाखल झाले. या पथकाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. कऱ्हाडात यापूर्वी झालेले रिव्हॉल्व्हर तस्करीचे गुन्हे तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांची हे पथक माहिती घेत आहे. संबंधित गुन्ह्यातील गुन्हेगारांची पार्श्वभूमी, त्यांच्या सध्याच्या हालचाली व स्थानिक टोळीच्या गुन्हेगारी कारवाया, आदी माहिती हे पथक घेत आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांकडूनही मदत घेतली जात आहे.
हा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असून, स्थानिक पोलीस ठाण्यातील ठराविक अधिकारी वगळता इतर कोणालाही या तपासाबाबत कसलीही माहिती नाही.
दरम्यान, पुणे येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली, त्यावेळीही एक विशेष पोलीस पथक कऱ्हाडला आले होते. कऱ्हाडातून त्या प्रकरणात काही माहिती पथकाच्या हाती लागल्याचे त्यावेळी सांंिगतले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस पथक कऱ्हाडात पोहोचले आहे.
नागोरीच्या सातारा कनेक्शनचाही शोध
काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पॅन कार्ड क्लब इमारतीवर रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला होता. मनसेचा एक तत्कालीन पदाधिकारी आणि मनीष नागोरीला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. गोळीबार झाला त्या काळात इमारतीनजीक एक मनसे पदाधिकारी वाहन चालविताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून दिसून आला होता. त्याच्या सोबत मनोज नागोरीही असल्याचे कॅमेऱ्याने टिपले होते. नागोरी सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असून, पानसरे यांच्यावरील हल्ल्याशी संबंधित काही सातारा कनेक्शन आहे का, याचाही बारकाईने शोध घेतला जात आहे.