आदर्कीत खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:25+5:302021-07-12T04:24:25+5:30
आदर्की : फलटण - सातारा रस्त्यावर प्रत्येकवर्षी लाखो रुपये खर्च करूनही रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी पाणी रस्त्यावर सोडल्याने डांबरामधील ताकद ...
आदर्की : फलटण - सातारा रस्त्यावर प्रत्येकवर्षी लाखो रुपये खर्च करूनही रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी पाणी रस्त्यावर सोडल्याने डांबरामधील ताकद कमी होऊन रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहेत. आदर्की गावात अरुंद रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे.
फलटण - सातारा रस्त्यावर फलटण - आदर्की फाटा या ३१ किलोमीटर अंतरात आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, बिबी फाटा, घाडगेवाडी, मिरगाव, वाठार फाटा, फरांदवाडी गावे आहेत. फलटण - सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे सर्वेक्षण झाले आहे. रस्त्यावर पडणारे पाणी नाल्यातून वाहून जाते, मात्र रस्त्याशेजारी राहणारे मिळकतधारक त्याठिकाणी सिमेंट पाईप टाकून नाला बुजवत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहिल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. आदर्की बुद्रुक येथे गटाराच्या सिमेंट पाईप व चेंबर्स रस्त्याच्या साईडपट्टीवर बांधले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने पावसाचे पाणी रस्त्याच्या मधून वाहते. त्यामुळे पोस्टाशेजारी खड्डे पडल्याने वाहने खड्ड्यात आदळतात. त्यामुळे दुचाकीस्वारांचे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून गटार खोदकामासाठी निघालेली माती हटवून रस्त्यावरील अडथळा दूर करण्याची मागणी वाहनधारक व प्रवाशांमधून होत आहे.
११आदर्की
फोटो : फलटण - सातारा रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथे खड्डा पडलेला आहे.