सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयनेचे एक युनिट बंद

By नितीन काळेल | Published: December 2, 2023 12:03 PM2023-12-02T12:03:08+5:302023-12-02T12:03:26+5:30

सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडले..

Irrigation by Sangli Irrigation Department Reduce water demand, One unit of the power plant at the foot of the Koyna Dam is closed | सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयनेचे एक युनिट बंद

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयनेचे एक युनिट बंद

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १,०५० क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. तर धरणात सध्या सुमारे ८४ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर पिण्याच्या पाणी योजना अवंलबून आहेत. तसेच सिंचनाच्या तीन मोठ्या योजनांनाही पाणी पुरविले जाते. तर वीजनिर्मितीसाठीही पाण्याचा कोटा राखीव असतो. मात्र, यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रातच पर्जन्यमान कमी होते. त्यामुळे धरण भरलेच नाही. तर ९४ टीएमसीवरच धरणातील पाणीसाठा गेला होता. त्याचबरोबर परतीच्या पावसानेही दगा दिलेला. त्यामुळे धरण भरले नसल्याने यंदा कोयनेतील पाणी तापू लागले आहे. त्यातच दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पाणीसाठा राखीव ठेवण्याची सूचना असताना सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करावा लागत आहे.

मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मागील शनिवारपासून धरणाच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला एक युनीट सुरू करुन १,०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. त्यानंतर सिंचनासाठी आणखी मागणी वाढली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृहाचे दुसरे युनीटही सुरू केले. त्यामुळे सांगलीतील सिंचनासाठी एकूण २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

त्यातच सांगलीतील सिंचनासाठी एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. सध्या सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून एक युनीट बंद करण्यात आले आहे. परिणामी एका युनीटमधूनच १,०५० क्यूसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे.

सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडले..

कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र हे सांगली जिल्ह्यातच आहे. त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पाणी सोडले जाते. तर धरणातील पाण्यावर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजना अवलंबून आहेत. पावसाळ्यापासून सांगलीतील सिंचनासाठी कोयनेतून तीनवेळा पाणी सोडण्यात आलेले आहे. तर यंदा धरण भरले नसल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात कपात करण्यात आलेली आहे.

Web Title: Irrigation by Sangli Irrigation Department Reduce water demand, One unit of the power plant at the foot of the Koyna Dam is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.