सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

By नितीन काळेल | Published: May 20, 2024 06:35 PM2024-05-20T18:35:06+5:302024-05-20T18:35:45+5:30

धरणातील पाणीसाठा..जाणून घ्या: १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष 

Irrigation demand of Sangli reduced; The discharge in Koyna Dam decreased | सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या २५.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष सुरू होणार आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी अुपरे पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपासूनच कोयनेसह उरमोडी, कण्हेर आदी धरणांतून सतत पाण्याची मागणी होत होती. तर कोयनेतून सांगली जिल्ह्यासाठी मागील पाच महिन्यांपासून पाणी सोडले जात आहे. पण सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी कमी झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ पासून सांगलीसाठी विसर्ग कमी करण्यात आला आहे. 

धरणाच्या विमोचक द्वारामधून १ हजार क्युसेक विसर्ग केला जात होता. तो ५०० क्युसेकने कमी झाला आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा वीज गृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधून २१०० आणि विमोचक द्वार ५००, असे २६०० क्युसेक पाणी सांगलीसाठी सोडले जात आहे. हे सर्व पाणी कोयना नदीतून सांगलीसाठी जात आहे. तर धरणातील पाणी तरतुदीचे तांत्रिक वर्ष ३१ मे रोजी संपत आहे. १ जूनपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. सध्या धरणात २५.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण २४.५२ इतके आहे.

Web Title: Irrigation demand of Sangli reduced; The discharge in Koyna Dam decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.