पाटखळ गटात पदरमोड करून आयसोलेशन व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:30+5:302021-06-01T04:29:30+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाटखळ गटामध्ये जनतेच्या सोयीसाठी पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे यांनी पदरमोड सुरू केली ...
सातारा : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाटखळ गटामध्ये जनतेच्या सोयीसाठी पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे यांनी पदरमोड सुरू केली आहे. गावागावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करून त्याठिकाणी स्वखर्चाने रुग्णांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप ते करत आहेत.
आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल शिंदे यांचे हे कार्य सुरू आहे. शिंदे हे पंचायत समितीच्या पाटखळ गणाचे सदस्य आहेत तर शिवथर गणामध्ये दयानंद उघडे हे सदस्य आहेत. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे- पाटील, पाटखळ गटाच्या विद्यमान सदस्य वनिता गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिंदे आणि उघडे या दोघांनीही समन्वय ठेवून आपले काम सुरू ठेवले आहे.
पाटखळ जिल्हा परिषद गटामध्ये दीड लाखांच्या आसपास जनता आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली असल्याने राहुल शिंदे यांनी पुढाकार घेत संपूर्ण पाटखळ गटामध्ये मदतकार्य उभे केले आहे. गटातील जनतेसाठी प्रत्येक गावामध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून, त्याठिकाणी रुग्णांच्या सोयीसाठी गाद्या, बेडशीट, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन, कापडी मास्क, वाफारा मशीन, आशा सेविकांसाठी सनकोट, हॅण्डग्लोव्हज् शिंदे यांनी स्वखर्चाने विकत घेऊन विनामोबदला दिले आहेत.
पाटखळ गटात येणाऱ्या आसगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल शिंदे, दयानंद उघडे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते. वडूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही ४० बेडची सुविधा करण्यात आली आहे. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणीही सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोट...
पाटखळ गटातील जनतेच्या सोयीसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. कोरोनाच्या लाटेमध्ये लोकांचे जीव वाचविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व साहित्य स्वखर्चाने खरेदी केले. गटातील प्रत्येक गावात सर्व सुविधा करत आहोत.
- राहुल शिंदे
फोटो ओळ : सातारा तालुक्यातील म्हसवे येथे पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे यांच्या माध्यमातून आयसोलेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तेजस शिंदे, दयानंद उघडे आदी उपस्थित होते.