जिल्हा परिषद अर्थसंकल्प सभेत अभियंत्यांचा शिक्षण मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:36+5:302021-03-18T04:39:36+5:30

सातारा : जिल्हा परिषदेंतर्गत काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा अर्थसंकल्पीय सभेत चांगलाच गाजला. सदस्य दीपक पवार ...

The issue of education of engineers was raised in the Zilla Parishad budget meeting | जिल्हा परिषद अर्थसंकल्प सभेत अभियंत्यांचा शिक्षण मुद्दा गाजला

जिल्हा परिषद अर्थसंकल्प सभेत अभियंत्यांचा शिक्षण मुद्दा गाजला

googlenewsNext

सातारा : जिल्हा परिषदेंतर्गत काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा अर्थसंकल्पीय सभेत चांगलाच गाजला. सदस्य दीपक पवार आणि अरुण गोरे यांनी अभियंत्यांच्या बोगस कागदपत्रांची चौकशी करण्याची जोरदार मागणी केली. यामुळे अध्यक्षांनीही याकडे लक्ष वेधले. तर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर बाब असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तर, याबाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’मध्ये सुरू आहे. या मालिकेचा आधार घेत सदस्य दीपक पवार यांनी ऐनवेळच्या विषयात अभियंत्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

पवार म्हणाले, ‘‘लोकमत’मध्ये जिल्हा परिषदेतील अभियंत्यांच्या शिक्षणाबद्दल बातम्या येत आहेत. जिल्हा परिषदेच्या दृष्टीने ही घृणास्पद बाब आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी शाखा व कनिष्ठ अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे तपासणीची मागणीच विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे बोगस अभियंते शोधण्याची गरज आहे. असे कोणी सापडले तर त्यांना निलंबित करा.

अरुण गोरे यांनीही बोगस अभियंते असतील, तर ही नामुश्कीची बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची दोन दिवसांत चौकशी करावी. बोगस विद्यापीठाची कागदपत्रे असतील तर कारवाई करण्याची गरज आहे. भीमराव पाटील यांनीही अभियंत्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासावी, असे जोरदारपणे सांगितले. यामुळे सभागृहातील वातावरण एकदम गंभीर झाले. त्याचवेळी याबाबत बांधकामाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे यांच्याकडे विचारणा करण्यात आली.

अध्यक्ष उदय कबुले यांनी यामध्ये लक्ष घालत विषय गंभीरपणे घेण्याचा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही या गंभीर विषयाकडे लक्ष देऊ, असे सभागृहात स्पष्ट केले.

....................................................

Web Title: The issue of education of engineers was raised in the Zilla Parishad budget meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.