पारगावचा उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:38 AM2021-03-21T04:38:01+5:302021-03-21T04:38:01+5:30
खंडाळा : आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पारगावजवळील महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या गावकऱ्यांना महामार्ग ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ...
खंडाळा : आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पारगावजवळील महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या गावकऱ्यांना महामार्ग ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे स्थानिकांच्या मागणीनुसार पारगावच्या उड्डाणपुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले.
खंडाळा-पारगाव येथे महामार्गावर असणारा सध्याचा उड्डाणपूल हा अतिशय छोटा आहे. त्याखालून मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत. खंडाळा-अहिरे रस्त्यावर असणाऱ्या अनेक कंपन्यांची मोठी वाहने तसेच म्हावशी येथील साखर कारखान्यांच्या ऊसाच्या ट्रकची वाहतूक करण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो. मात्र, ही वाहने पुलाखालून जाणे अवघड आहे. यासाठी महामार्गावर इतर गावातून असलेल्या मोठ्या पुलांसारखा हाही पूल व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याने खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत यावर चर्चा घडवून आणली. त्यानंतर पारगाव येथे पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन चर्चा केली.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, मारुती पवार, उपसरपंच दत्तात्रय पवार, भरत ढमाळ, चंद्रकांत यादव, भानुदास यादव, अशोक जाधव, सचिन यादव, मोहन गायकवाड यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खंडाळा बसस्थानक व पारगाव या ठिकाणी पुलाची उंची साडेपाच मीटर ठेवण्यात यावी, त्यामुळे महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करणे, एलईडी दिवे बसविण्यात यावेत, पारगाव कमान ते भैरवनाथ मंदिरापर्यंत दोन्ही बाजूने गटार काढणे, बसस्थानक ते राजावत हॉटेलपर्यंत असणाऱ्या रस्त्याच्या कडेला दुर्तफा लाईटची सोय करण्यात यावी, यावर चर्चा झाली.
पॉईंटर करणे
-खंबाटकी घाटात नवीन बोगद्याचे काम सुरू आहे. ते अधिक गतीने व्हावे तसेच बोगदा ओलांडल्यानंतर संपूर्ण रस्ता फ्लायओव्हर ब्रीज तातडीने पूर्णत्वास जावा, यासाठीही प्रयत्नशील असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले.
-पारगावचे पुरातन भीमाशंकराचे मंदिर विस्तारीकरणात येत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, प्राधिकरणाच्या मदतीने मंदिराची जागा हलवून पुन्हा जीर्णोद्धार करण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखविली आहे. त्यामुळे उड्डाणपूल निर्मितीत अडचण राहिली नाही.
२०खंडाळा
पारगाव खंडाळा येथे पुलाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन चर्चा केली.