बंडाळेंच्या वादग्रस्त तोडग्याने तणावाची स्थिती

By admin | Published: July 22, 2015 09:49 PM2015-07-22T21:49:34+5:302015-07-22T23:56:25+5:30

दोडामार्गमधील घटना : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी संतोष नानचेंचे उपोषण

The issue of tension in the controversial settlement of the rebels | बंडाळेंच्या वादग्रस्त तोडग्याने तणावाची स्थिती

बंडाळेंच्या वादग्रस्त तोडग्याने तणावाची स्थिती

Next

दोडामार्ग : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे होणारे हाल रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता कसई-दोडामार्गचे माजी सरपंच संतोष नानचे यांनी बुधवारी रुग्णालयासमोरच एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. तसेच तत्काळ रिक्त पदे भरली नाहीत, तर यापुढे बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी डॉ. संजय बंडाळे यांनी संतोष नानचेंची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु उपोषणकर्त्यांनी स्त्री-रोगतज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी लावून धरली. यावेळी बंडाळे यांनी सावंतवाडी येथील डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना चार दिवसांसाठी पाठविण्यात येईल, असे सांगितले. मात्र, लेखी देण्यास नकार दिल्याने उपोषणकर्ते व डॉ. बंडाळे यांच्यात बाचाबाची होण्याचा प्रकार घडल्याने उपोषणस्थळी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, येथे पोलीस बंदोबस्त असल्याने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार वारंवार करण्यात आला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आजार कोणताही असो, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना गोव्यात जावे लागते. त्याचा आर्थिक व मानसिक मनस्ताप रुग्ण आणि त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरावीत आणि रुग्णांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी कसई-दोडामार्गचे माजी सरपंच संतोष नानचे यांनी दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली होती. तसेच प्रभारी जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. संजय बंडाळे यांची भेट घेऊन त्यांचेही लक्ष वेधले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी न भरल्याने अखेर बुधवारी शहरातील ग्रामस्थांना घेऊन ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. संजय बंडाळे यांनी दोडामार्ग येथे येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मिलिंंद भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, डॉ. एस. डी. पितळे यांच्याकडे प्रभारी अधीक्षकपदाचा कार्यभार देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, यावर उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची सावंतवाडी येथे बदली झाल्याने स्त्रीरोगतज्ज्ञाचे पद रिक्त आहे. तर सावंतवाडी येथे सध्या दोन स्त्रीरोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यामुळे त्यातील एक स्त्रीरोगतज्ज्ञ दोडामार्गला पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. डॉ. बंडाळे यांनीही चार दिवसांकरिता सावंतवाडीतील स्त्रीरोग तज्ज्ञांना दोडामार्गमध्ये पाठविण्याचे मान्य केले. परंतु लेखी लिहून देण्यास नकार दिला. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला. यावेळी उपोषणकर्ते आणि डॉ. बंडाळे यांच्यात काही वेळ बाचाबाची झाली. (प्रतिनिधी)

बंद खोलीत दडलंय काय?
डॉ. संजय बंडाळे यांनी उपोषणकर्त्यांना सावंतवाडीतील एक स्त्रीरोगतज्ज्ञास दोडामार्गमध्ये चार दिवसांकरिता पाठविण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांची डॉ. पितळेंसोबत बंद खोलीत चर्चा झाली. मात्र, काहीवेळाने बंडाळेंनी आपला निर्णय बदलत लेखी लिहून देण्यास नकार दिला. त्यामुळे बंद खोलीआड नेमकी कोणती चर्चा झाली, ज्यामुळे डॉ. बंडाळेंना आपला निर्णय बदलावा लागला, याची चर्चा उपोषणस्थळी सुरू होती.
मागण्यांचा पाठपुरावा करणार : नितिन बिलोलीकर
उपोषणस्थळी सायंकाळी उशीरा चर्चेसाठी आलेले जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांनी संतोष नानचे यांना दोडामार्गातील गरजू असणाऱ्या स्त्रीरोग तज्ञाबाबत गुरूवारी आरोग्य उपसंचालकांशी भेट घेऊन ठोस निर्णय देण्याचे आश्वासन दिले. शिवाय जर कोणी डॉक्टर तसा मिळाला तर त्याला अकरा महिन्याच्या करारावर घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अन्यथा १३ आॅगस्टपासून आमरण उपोषण - नानचे
संतोष नानचे यांनी शवगृहातील शीतयंत्र-कॉम्प्रेसर बंद पडल्याचा प्रश्नही निकालात काढण्याची विनंती केली. जर आरोग्य केंद्राच्या बाबतच्या आपल्या मागण्या १२ आॅगस्टपर्यंत मान्य न झाल्यास १३ आॅगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी डॉ. बिलोलीकर यांना निवेदनाद्वारे दिला.

Web Title: The issue of tension in the controversial settlement of the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.