बाप्पांना पुष्पमाला घालणेही अवघड
By admin | Published: September 23, 2015 10:13 PM2015-09-23T22:13:38+5:302015-09-24T00:06:15+5:30
बाजारात फुलेच नाहीत : गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट
विठ्ठल नलवडे - कातरखटाव दुष्काळी पट्ट्यातल्या ग्रामीण भागात साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवावर दुष्काळाची छाया दिसत आहे. गेले दोन महिने कातरखटाव गावात माळकऱ्यांच्या घरातल्या, दुकानातल्या, देव्हाऱ्यातील मूर्तीला फुलांचा हारच मिळत नसल्याने नुसती अगरबत्ती लावून ‘देवा माफ करा,’ म्हणून हात जोडायची वेळ व्यापारी व दुकानदारांवर आली आहे.
गणेशोत्सवात सुमारे तीस टक्के गणेशमूर्ती विक्री झाल्या नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने गणेश मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गणेश मंडळांनी यावेळेस गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
गणेशमूर्तींची वाढती मागणी लक्षात घेता कारागीरांची आकर्षक रंगसंगती करून ग्राहकांच्या आवडीनुसार मूर्ती बनविल्या. ज्या बुकिंग झाल्या होत्या त्यांची विक्री झाली. मात्र ज्या अपेक्षेने व्यावसायिकांनी गणेशमूर्ती बाजारात विक्रीकरिता आणल्या, त्या अपेक्षेने विक्रीला प्रतिसाद मिळाला नाही. लहान मूर्तींबरोबर जास्त किमतीच्या मोठ्या गणेशमूर्ती ग्रामीण भागातील कुंभाराकडे विक्रीअभावी शिल्लक राहिल्या आहेत.
साधारण: ३० टक्के मूर्ती शिल्लक राहिल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी खरिपातील पीक पावसाअभावी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी, गणेशमंडळ, नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून येत आहे.
तेला-मिठाला महाग...
पाणीसंकट, हवामानाच्या बदलामुळे फुलांची रोपे जळून जाऊ लागली आहेत. शंभर रोपांना सहाशे रूपये मोजावे लागतात. गावात रोजचे शंभर हार जात होते. महिन्याचे पाच हजार नुकसान होत आहे. आता तेला-मिठाला महाग झाल्यासारखे दिवस आले आहेत.
अनुसया माळी, माळकरी, रानमळा माळीवस्ती.