आर्थिकतेसह मानसिक भक्कमताही आवश्यक-१० हजार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:45 PM2019-12-21T23:45:22+5:302019-12-21T23:46:33+5:30
'समृद्ध समाजासाठी फक्त आर्थिक सुबत्तेचा विचार करून चालणार नाही तर यामध्ये समजातील प्रत्येक घटकाच्या मानसिक स्वास्थ्याचाही विचार व्हायला हवा. या दृष्टीने महिलांना सक्षम आणि सबल करण्याचे काम करत आहे.' - प्रा. संध्या चौगुले, संस्थापक, हिरवाई संस्था
दीपक शिंदे ।
सातारा जिल्ह्यातील ८३ गावांमधील सुमारे १० हजारांहून अधिक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या प्रा. संध्या चौगुले यांचा नुकताच दिल्ली येथे 'मेक इन इंडिया' या पुरस्काराने गौरव करण्यात आला. महिलांना केवळ आर्थिक नाही तर मानसिक भक्कम करण्याचे काम त्या गेली २० वर्षे करत आहेत. पहिल्यांदा स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन नंतर बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेल्या या महिलांची उत्पादने सध्या जागतिक बाजारपेठेत पोहचली आहेत. नेमके काय आहे त्यांचे काम याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...
- प्रश्न : आरोग्यदायी व आर्थिक संपन्न भारत ही संकल्पना काय आहे.
उत्तर : आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना स्वत:च्या पायावर उभे करून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ज्यांनी काम केले. त्यांना मेक इन इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी राबविलेले उपक्रम देशभरात राबविता येतील का याबाबत विचारमंथन या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये केशव मुरारी दास यांनी अध्यात्म, डॉ. अंकित सिंह यांनी मनुष्यबळविकास, डॉ. तनीषा दत्ता यांनी प्रशासन, इलमा अफरोज, नीलम प्रताप रुडी यांनी व्यवसाय, बिंदू भूषण दुबे यांनी प्रेरणात्मक काम याबाबत आपले विचार मांडले. तर मी ग्रामस्वच्छता अभियान आणि त्यातून उभा राहणारा समर्थ भारत या विषयावर विचार मांडले.
- प्रश्न : आपल्या या क्षेत्रातील कामाबाबत काय सांगाल..?
उत्तर : गेली २० वर्षे ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. महिलांमध्ये पहिल्यांदा आत्मविश्वास निर्माण करायचा. त्यानंतर त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मार्ग उपलब्ध करून द्यायचा. त्यांना छोटे-छोटे उद्योग सुरू करण्यासाठी नियोजन करून द्यायचे आणि तो उद्योग व्यवस्थित चालविण्यासाठी एकमेकांची मदत द्यायची. त्यांनी केवळ पैसे मिळविणे हा उद्देश नव्हता तर आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला.
- प्रश्न : भारत आर्थिक आणि सामाजिक सक्षम होण्यासाठी काय आवश्यक आहे असे वाटते ?
उत्तर : भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या खेड्यात राहते. तेथील बेरोजगार तरुण, गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. भारताच्या आर्थिक संपन्नतेचे लक्ष्य साधताना या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्रामीण भागातील युवकवर्गाला, महिलांना आत्मविश्वास देऊन लघुउद्योग करण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. महिलांना नेतृत्वाची संधी मिळते. मात्र, कर्तृत्व असूनही अधिकार दिले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. यातून देशाची जवळजवळ अर्धी ऊर्जा सुप्तावस्थेत राहते. देशाला आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी स्त्री सक्षम असणेही महत्वाचे आहे.