पूरग्रस्तांसाठी ते बनले संकटमोचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:35 AM2021-08-01T04:35:36+5:302021-08-01T04:35:36+5:30
सचिन काकडे सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा यंदा सर्वात मोठा फटका बसला. नद्यांना महापूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. घरे उद्ध्वस्त ...
सचिन काकडे
सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा यंदा सर्वात मोठा फटका बसला. नद्यांना महापूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. घरे उद्ध्वस्त झाली तर काहींना जीवही गमवावा लागला. निसर्गाच्या या रुद्रावताराचा फटका महावितरणलादेखील बसला अन् जिल्ह्यातील शेकडो गावे अंधारात बुडाली. मात्र, जिगरबाज वीज कर्मचाऱ्यांनी पाऊस, पुराचा धीरोदत्तपणे सामना करत ही गावे प्रकाशमान तर केलीच शिवाय संकटमोचक म्हणून पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिले.
जिल्ह्यात यावेळी मान्सून उशिरा सक्रिय झाला. मात्र, पुढे काय होईल, याची कोणी तसूभरही कल्पना केली नव्हती. गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरशः तांडव घातले. या पावसामुळे नद्यांना पूर आला, रस्ते खचले, दरडी कोसळल्या, अनेक घरांची पडझड झाली, शेती वाहून गेली. इतकेच नव्हे तर दीड हजारहून अधिक विजेचे खांब जमीनदोस्त झाले. एकीकडे निसर्गाचा प्रकोप सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल ४२६ गावे अंधारात बुडाली अन् या गावांचा बाहेरील जगाशी संपर्कच तुटला. त्यामुळे अशा गावांपर्यंत मदत पोहोचविणे अडचणीचे ठरू लागले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर पुढे सरसावले असतानाच वीज कर्मचाऱ्यांनीदेखील सलग चार-पाच दिवस पावसाचा मारा, पूर, थंडी, चिखल, दरडी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करत गावे प्रकाशमान करण्याचे काम केले.
अनेक ठिकाणी विजेचे खांब वाहून गेले होते. जिथे माणसाला नीट चालता येत नाही, अशाठिकाणी या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खांद्यावर खांब वाहून नेले. पुराच्या पाण्यात उभं राहून वीज जोडणी केली. प्रचंड जोखीम पत्करून या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी आव्हानात्मक काम कमी कालावधीत पूर्ण केलं आणि अंधारात गेलेली गावे पुन्हा प्रकाशमान झाली. वीज आल्यामुळे या गावांचा पुन्हा बाहेरील जगाशी संपर्क आला. गावोगावच्या पाणी योजना पुन्हा सुरू झाल्या. प्रशासनाला गावांपर्यंत मदत पोहोचविणे सोपे झाले. हे सर्व साध्य झाले ते महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे. संकटमोचक ठरलेल्या या कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
(चौकट)
- गावांची वीज परत आल्याने पाणी योजना सुरू झाल्या.
- बंद पडलेली दूरध्वनी सेवाही पूर्ववत झाली.
- संपर्कामुुळे डोंगरी भागात शासकीय यंत्रणेला पोहोचता आले.
- नुकसानग्रस्तांपर्यंत मदतही पोहोचवता आली.
- टेलिव्हिजन सुरू झाल्याने पावसाच्या अंदाजाबाबतची माहिती मिळू लागली.
(कोट)
अतिवृष्टी व महापुराचा महावितरणला मोठा फटका बसला. खांब वाहून गेले, रोहित्र बंद पडले. शेकडो गावे अंधारात बुडाली. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी या नैसर्गिक आपत्तीचा जिद्दीने सामना केला. कधी पुराच्या पाण्यात उभं राहून तर कधी गुडघाभर चिखल तुडवत वीजजोडणी केली. कधी खांद्याची कावड करून खांबही वाहून नेले. पूरग्रस्तांसाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता