पश्चिम भागात पाऊस सुरूच; कोयना साठ्यात एक टीएमसी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:40+5:302021-07-17T04:29:40+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासात कोयना धरणसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासात कोयना धरणसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ४७ टीएमसीवर गेला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला २३, नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पाऊस सुरू झाला आहे. मागील आठवड्यापासून पश्चिम भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होत आहे. पश्चिमेकडे पाऊस सुरू असल्याने भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नवजा येथे ७० मिलिमीटर झाला तर जूनपासून आतापर्यंत तेथे १,५९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनेला जून महिन्यापासून १,१९८ आणि महाबळेश्वरला १,६६६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. शुक्रवारी सकाळी कोयना धरणात ४७.२० टीएमसी पाणीसाठा झाला तर गुरुवारी ४६.०३ टीएमसी साठा होता. २४ तासात कोयना धरणात एक टीएमसीहून अधिक पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. शुक्रवारी सकाळी १८,०७४ क्युसेक वेगाने पाणी येत होते.
दरम्यान, जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. तरीही गतवर्षीपेक्षा यंदा अजूनही पाणी आवक कमी आहे.
पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. पण, अजूनही ओढ्यांना पाणी नाही. छोटे पाझर तलाव कोरडे पडले आहेत. माण, खटाव, फलटण तालुक्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
.........................................................