सातारकरांसाठी आयटी हब अजूनही स्वप्नवतच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:36+5:302021-09-22T04:43:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुंबई, पुण्यासह बंगळुरूशी असलेली कनेक्टिव्हिटी, आरोग्यदायी वातावरण, सुरक्षितता असूनही सातारकरांसाठी आयटी हब अद्याप स्वप्नवत ...

IT hub still a dream for Satarkars! | सातारकरांसाठी आयटी हब अजूनही स्वप्नवतच !

सातारकरांसाठी आयटी हब अजूनही स्वप्नवतच !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मुंबई, पुण्यासह बंगळुरूशी असलेली कनेक्टिव्हिटी, आरोग्यदायी वातावरण, सुरक्षितता असूनही सातारकरांसाठी आयटी हब अद्याप स्वप्नवत आहे. कॅपजेमिनी या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीला नुकतीच भेट दिल्याने येथे मोठ्या गुंतवणुकीची शक्यता वर्तविली जात आहे. द्वितीय आणि तृतीय दर्जाच्या शहरांमध्ये समावेश असूनही साताऱ्याकडे कंपनी वळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या राजकीय इच्छाशक्तिचा अभाव, हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसते.

देशातील आयटी कंपन्यांची पुणे आणि मुंबई येथे वाढ होण्याला मर्यादा आल्याने छोट्या शहरांमध्ये आयटी हब तयार करण्याची घोषणा ऑगस्ट महिन्यात माहिती तंत्रज्ञान आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. यात साताऱ्यासह अमरावती, नागपूर, लातूर आणि नांदेड या शहरांचा समावेश आहे. या शहरांच्या यादीत साताऱ्याचा समावेश झाल्याने येथे आयटी हबच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

नुकतेच कॅपजेमिनी या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी बारामती, कर्जत - जामखेड, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये आयटी सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेत साताऱ्याचा नामोल्लेखही झाला नाही.

चौकट :

आयटी कंपन्यांसाठी हे आवश्यक

करात सवलत मिळावी

काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे

कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे

दळणवळणाची योग्य सोय असावी

राजकीय इच्छाशक्तिचे पाठबळ

कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी सुरक्षित वातावरण लागते. कंपनी उभी करताना कोणतीही अडचण आली तर त्यावर अधिकाराने मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींची नितांत गरज असते. साताऱ्यात दोन्ही राजेंमधील कलह ही अनेकांना धोक्याची घंटा वाटते. त्यामुळे आपापसातील राजकीय हेवेदावे काही काळासाठी बाजुला ठेवून साताऱ्यात आयटी हब होण्यासाठी दोन्ही राजेंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांनी साताऱ्यात असे हब तयार झाले तर त्याचा दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होणार आहे.

आयटीकरांना आस आपल्या शहराची

कोविड काळाने अनेक आयटी तज्ज्ञांना आपल्या शहराशी नाळ जोडायला भाग पाडले आहे. वर्क फ्रॉम होमनंतर आता वर्क फ्रॉम एनीवेअर ही संकल्पना आयटी क्षेत्रात येऊ लागली आहे. मोठ्या शहरांत राहण्यापेक्षा आपल्या शहरात राहण्याला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात नामांकित शाळा असल्याने मुलांच्या भवितव्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. परिणामी आयटी क्षेत्रातील तरूणाई आपल्या शहराकडे येण्याच्या मानसिकतेत आहे.

मोठ्या कंपन्यांना आस छोट्या शहरांची

मेट्रो शहरांमध्ये वसलेल्या आयटी कंपन्यांच्या विस्ताराला आता मर्यादा आल्या आहेत. विस्तार करण्यासाठी महानगरांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा छोट्या शहरांच्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. मोठ्या शहरांमध्ये राहून त्या तोडीचे पगार आणि अन्य खर्चांना आळा बसविण्याचा निर्णय काही व्यवस्थापनांनी घेतला आहे. कुठूनही काम करण्याची मुभा दिल्यानंतर इमारत खर्चासह दळणवळण आणि अन्य सोयींवर होणारा खर्चही कंपनी वाचवू शकते.

कोट :

अनुभव समृध्द झाल्यानंतर पुन्हा आपल्या शहराकडे जाण्याची आस लागते. कोरोनाने अनेकांचे पाय त्या अर्थाने जमिनीवर आणले आहेत. त्यामुळे कुटुंबासह आपल्या शहरात राहण्याचा आनंद आणि सुरक्षितता कुठेच नाही. सातारा आयटी हब झाले तर शहराची मरगळ दूर होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

- पवनजीत माने, आयटी कर्मचारी, सातारा

.......

Web Title: IT hub still a dream for Satarkars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.