संजीवराजे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी सलग ६० तासांनंतरही IT'ची चौकशी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:30 IST2025-02-08T16:30:35+5:302025-02-08T16:30:52+5:30
सगळ्या पुढाऱ्यांना एकाच पारड्यात तोलू शकत नाही : रघुनाथराजे

संजीवराजे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी सलग ६० तासांनंतरही IT'ची चौकशी सुरूच
फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी ५ फेब्रुवारीला सकाळी ६ वा. आयकर विभागाने छापे टाकले. पहिल्या दिवशी आयकर विभागाने संजीवराजे यांची तब्बल १७ तास चौकशी केली. दुसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा सकाळी लवकरच सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अजून दोन दिवस चौकशी सुरू राहील, असे रघुनाथराजे निंबाळकर यांनी सांगितले.
सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना घेऊन त्यांच्या गोविंद मिल्क या ठिकाणी चौकशीसाठी गेले. दरम्यान, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू होते.
पुणे येथील चौकशी तब्बल ५० तासानंतर संपली
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील लक्ष्मी या निवासस्थानी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल ५० तासांनंतर संपली आहे. कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीला नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी पूर्णपणे सहकार्य केले. पुण्यातील चौकशी संपली असली तरीही फलटण येथील चौकशी मात्र अजूनही सुरूच आहे. पुणे येथील चौकशी संपली हे वृत्त फलटण येथील सरोज व्हिला या निवासस्थानाबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना समजताच या ठिकाणी असलेला तणाव निवळला.
सगळ्या पुढाऱ्यांना एकाच पारड्यात तोलू शकत नाही : रघुनाथराजे
काही जरी चेक केलं तरी काही वेडवाकडं असेल तर सापडेल. वेडवाकडं नसेल तर सापडूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यांना जी अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या इस्टेटची अपेक्षा असेल ती सापडू शकत नाही. महाराष्ट्रात काहीतरी घरे असतील जी पहिल्यापासून चांगली असतील. सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तोलू शकत नाही, असेही यावेळी रघुनाथराजे म्हणाले.