राज्यात वसतिगृहांची अनुदाने मिळत नाहीत ही शोकांतिका - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:26 PM2024-07-11T12:26:05+5:302024-07-11T12:26:34+5:30
फुले, आंबेडकर साहित्य पंचायतीचे पुरस्कार प्रदान
सातारा : सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्यकर्त्यांकडे आस्था नाही. राज्यात गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिक्षण संस्था व वसतिगृहांची अनुदाने मिळत नाहीत ही पुरोगामी महाराष्ट्रातील शोकांतिका असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
भारतीय भटके व विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने पुढे आंबेडकर साहित्य पंचायतीच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भाई शैलेंद्र माने, यशवंत माने, प्रा. जीवन बोराटे, डॉ. समता जीवन, मच्छिंद्रनाथ जाधव, शशी माने, हरिदास जाधव, नारायण जावलीकर, सुलोचना माने, कादंबरी माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘मागील काही दिवसांमध्ये अनुदान थकीत ठेवण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची वाढली आहे. एकीकडे मोफत योजनांचे गाजर दाखवून मतांचे राजकारण करताना दुसरीकडे गोरगरीब आणि सामान्य यांच्यावर अन्याय होत आहे. राज्यातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण संस्था, वसतिगृहांची अनुदाने मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांची अडचण होत आहे.’
दरम्यान, भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने फुले आंबेडकर साहित्य पंचायतीच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. नागोराव कुंभार, साहित्यिक रामराजे तथा रावणराजे आत्राम यांना संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार तर लेखक विलासराव माने यांना युवा साहित्य पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीनिवास पाटील यांच्यासह रामराजे आत्राम, विलासराव माने, प्रा. डॉ. नागोराव कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.