अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं: वर्षा देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:57 PM2019-01-15T23:57:43+5:302019-01-15T23:57:48+5:30
सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही ...
सातारा : ‘मकर संक्रांतीचा सण म्हटलं की तिळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी खरं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरं पेक्षा खरं बोलणं आणि त्यातून समाजात क्रांती निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व घडवणं महत्त्वाचं आहे,’ असे मत लेक लाडकी अभियानाच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले.
सण, समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरे न होता त्याला आधुनिकतेचीही जोड मिळणं आवश्यक आहे. रोजच्या जीवनाशी, व्यवहाराशी त्याचं सांगड घालणं गरजेचं आहे. राग येणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण चुकीच्या गोष्टीचा राग येणं आवश्यक आहे; पण राग व्यक्त करण्याची पद्धत सकारात्मक असली पाहिजे. राग आल्यामुळे आणि चुकीच्या गोष्टींच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सामाजिक आंदोलने आणि चळवळी उभ्या राहत असतात; पण त्यातून हिंसा होणं गैरच आहे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या त्या व्यक्तींविषयी राग न धरता त्याला ती चूक का करावी वाटली, याचा विचार करून त्या बाबीविषयी राग येणं गरजेचं आहे. महात्मा गांधी याबाबत आमचे आदर्श आहेत. त्यांना चुकीच्या गोष्टींची प्रचंड चीड होती; पण त्यांनी कायम प्रेमाने, संयमाने आणि माणुसकीला साद घालून एखाद्यातील दुष्प्रवृत्तीला बाहेर काढलं. ती नाहीशी केली जाईल, याच पद्धतीने त्यांनी धरणे आंदोलन, उपोषणे आदी केली. अंहिसेच्या मार्गाने जाताना कायम गोड बोलणं हे एक मोठं शस्त्र ठरू शकतं. त्यामुळे गुड बोला किंवा गोड बोला, हे म्हणणं पुरेसं नाही, तसं पाहता बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं महत्त्वाचं आहे. गोड बोलण्यापेक्षा कधीतरी कडवट बोललं तरी चालेल; पण समोरच्याचं हित होईल, अशा पद्धतीने आपण बोलणं गरजेचं आहे.
राज्यात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार याला आळा घालण्यासाठी समाज म्हणून सर्वांनी संघटित होणं आणि महिला अधिकारासाठी एकत्रित लढा उभं करणंही महत्त्वाचं आहे. बालविवाह रोखून आपण काही आयुष्य घडवू शकलो तर सणाचं निमित्त सार्थकी लागेल. सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी, सत्याचा आग्रह धरत लढाऊपणे चीड आणणारी माणसंच हा समाज बदलू शकतील, अशी माझी धारणा आहे. आपण आपल्याला केवळ गोड बोलण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण चांगलं काम करुया, परस्परांशी गोड बोलता येईल, असं शांत, सुंदर, अहिंसक वातावरण महाराष्ट्रात निर्माण करूया, असं मला वाटतं.