सुरू झाला पावसाळा, आता आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:19+5:302021-07-19T04:24:19+5:30

सातारा : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे पावसाळ्यात उद्भवणारे आजार डोकेदुखी वाढवू लागले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून डायरिया, ...

It started raining, now take care of your health | सुरू झाला पावसाळा, आता आरोग्य सांभाळा

सुरू झाला पावसाळा, आता आरोग्य सांभाळा

Next

सातारा : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे पावसाळ्यात उद्भवणारे आजार डोकेदुखी वाढवू लागले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला, पडसे याशिवाय कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया, मलेरिया, डेंग्यू असे आजार डोके वर काढू लागले आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. मात्र, हा पावसाळा अनेक आजार सोबत घेऊन येतो. अशा आजारांकडे कोरोना महामारीच्या काळात दुर्लक्ष करून मुळीच चालणार नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा आजारांत वाढ होऊ लागली आहे. ही सर्व लक्षणे कोरोनाची असल्याने चिंतेत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार करुन घेणे गरजेचे आहे. याशिवाय पावसात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार उद्भवतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात. पावसाळ्यातील या आजारांमुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते.

पावसाळ्यात अनेकदा संसर्गजन्य आजारांसह त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोरायसिस यासारखे विकारही उद्भवू शकतात. डास चावल्याने डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होत असतो. हे आजार टाळण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यातील साथरोग टाळण्यासाठी पौष्टिक आहार घेऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

(चौकट)

पावसाळ्यातील आजार

डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला, पडसे, कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया, मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग, फंगल इन्फेक्शन, मुरूम आणि सोरायसिस

(चौकट)

अशी घ्या काळजी

- पिण्याचे पाणी शक्यतो उकळून व थंड करून प्यावे.

- रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

- आहारात गाजर, हळद, लसूण, आले, बोक्रोली यांचा समावेश करावा.

- पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील पदार्थ व अर्धवट सोडलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.

- डासांपासून बचाव करण्यासाठी घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या आजुबाजूला पाणी साचू देऊ नका.

- घरामध्ये डास प्रतिबंधक जाळ्या, मच्छरदाणी औषधे, क्रीम यांचा वापर करावा. घरामधील फुलदाणी, फिशटॅँक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी.

- पावसात भिजू नये. नियमित व्यायाम करावा.

- कोरोना संक्रमणाचा काळ असल्याने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

- सर्दी, खोकला, ताप, थंडी अशी लक्षणे आढळल्यास तातडीने व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

Web Title: It started raining, now take care of your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.