कोरोना चाचणीच्या अहवालासाठी लागताहेत पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:09+5:302021-04-13T04:37:09+5:30
वाठार स्टेशन : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सध्या ग्रामीण भागातील जनताही मोठ्या संकटात सापडली आहे. दररोजची कोरोनाची वाढती आकडेवारी ...
वाठार स्टेशन : राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोनाने सध्या ग्रामीण भागातील जनताही मोठ्या संकटात सापडली आहे. दररोजची कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी शासन, आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी कोरोना चाचणीचे अहवाल मिळण्यासाठी मात्र तब्बल पाच ते सहा दिवस विलंब होत असल्याने उपचारासाठी कोरोना रुग्णाला हाल सोसावे लागत आहेत.
सध्या कोरोनाचा फास शहराबरोबरच ग्रामीण भागातही घट्ट झाला आहे. दररोजची वाढती कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही रुग्ण संख्या मात्र कुठेही कमी होताना दिसत नसल्याने कोरोना रुग्ण संपर्कात आलेल्या लोकांच्या जास्तीत जास्त आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, शासनस्तरावर या चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी किमान पाच दिवसांचा वेळ जात आहे.
या कालावधीत जर रुग्ण कोरोना बाधित नसेल तरी त्याला घरी बसण्याची वेळ येत आहे. तर बाधित असेल तर तोपर्यंत तो कितीजणांच्या संपर्कात येईल याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.
शासनाने कोरोना या महाभयानक आजाराबाबतीत योग्य धोरण राबवित कोरोना हद्दपार करण्यासाठी योग्य उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, दुसरीकडे नियोजनात थोडीफार ढिलाई होत असल्याने रुग्णांना याचा फटका बसत आहे.