Satara- नात्याला काळिमा: सख्ख्या भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार
By दत्ता यादव | Published: September 8, 2023 01:09 PM2023-09-08T13:09:46+5:302023-09-08T13:11:15+5:30
बहीण गरोदर; आई-वडील मोलमजुरीला गेले असताना वारंवार कृत्य
सातारा : कोरेगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षांच्या अल्पवयीन भावानेच आपल्या १५ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला. यात बहीण गरोदर राहिली असून, पोलिसांनी संबंधित संशयित भावाला तातडीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी १५ वर्षांची असून, मागील काही वर्षांत शाळा सोडून ती घरीच राहत होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असायचे. पीडितेचा भाऊ राहायला नातेवाइकांकडे परगावी होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेचा भाऊ एके दिवशी दुपारीच घरी आला. आल्यानंतर त्याने बहिणीला दमदाटी करून जबरदस्तीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. घरातील कोणास या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची त्याने धमकी दिली.
दरम्यानच्या काळात अनेक वेळा घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन गेल्या आठ महिन्यांपासून भाऊ वारंवार बहिणीवर अत्याचार करत राहिला. बहिणीने माराच्या भीतीने या गोष्टीची वाच्यता कुठेच केली नाही. मात्र मंगळवार, दि. ५ रोजी तिच्या हातापायाला सूज आल्याने मुलीच्या आईने तिला शासकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना कळवली. त्यावेळी खोदून विचारल्यानंतर पीडित मुलीने सख्ख्या भावाने अत्याचार केल्याचे आपल्या आईला सांगितले.
पोलिसांनी तत्परता दाखवत ताबडतोब अत्याचारी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास सातारा येथे बालन्याय मंडळ या ठिकाणी हजर केले असता त्याला बालन्याय मंडळाने अभिरक्षा सुनावली असून. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर हे करीत आहेत.