आली रे आली आता आपली बारी आली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:19 AM2019-09-25T00:19:13+5:302019-09-25T00:21:06+5:30
क-हाड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंसोबत फिरले, सभा घेतल्या; पण भाजपमध्ये गेल्यानंतर उदयनराजेंनी चव्हाण यांच्यावरच जोरदार टीका केल्याने ते आता त्यांना मदत करतील, असे काही वाटत नाही. याठिकाणी अतुल भोसले यांनाच त्यांची मदत होईल. त्यामुळे
दीपक शिंदे --सातारी बाणा
सातारा : बरं झालं सातारा विधानसभेसोबत लोकसभा लागली नाही... नाहीतर उदयनराजेंबाबतच्या नाराजीचा फटका आपल्यालापण बसला असता. म्हणून मनात मांडे खाणाऱ्या अनेकजणांना मंगळवारी निवडणूक जाहीर होताच ठसका लागला. तर काहीजणांनी आता आपली आमदारकी फिक्स म्हणून मिठाई वाटली. आमदारकी आणि खासदारकीची पोटनिवडणूक एकत्र आणि वेगवेगळी लागली तर काय, यावर व्यक्त झालेल्या या प्रतिक्रिया. यावर मतदार अन उमेदवारांनी ‘आली रे आली आता आपलीपण बारी आली,’ असे म्हटले तर नवल ठरू नये.
पारडं कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला; पण तराजू आपल्याच हातात राहिला पाहिजे, असे उदयनराजे भोसले यांचे नियोजन असते. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी याच अटी भाजपसमोर ठेवल्या. विधानसभेसोबत लोकसभा निवडणूक लागली पाहिजे आणि लोकसभा निवडणुकीत जर दगा फटका झाला तर राज्यसभेवर घेण्यात यावे. विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक लागली नाही आणि उदयनराजेंना पहिल्याच घासाला खडा लागला, असे वाटले; पण त्यांनी आशा सोडली नव्हती. तशी कार्यकर्त्यांनाही आशा होतीच. काही तरी चमत्कार होणार आणि पुन्हा विधानसभेसोबतच लोकसभेची निवडणूकही लागणार. शेवटी तसेच झाले आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला.
लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेसोबत होण्याने काय राजकीय बदल होतील, हे पाहणे आता अत्यंत रंजक ठरणार आहे. खासदारकीचा तीन महिन्यांतच राजीनामा दिल्यामुळे उदयनराजेंबाबत लोकांच्या मनात नाराजी आहे. या नाराजीचा फटका भाजपकडून उमेदवारी करणाºया उमेदवारांना बसू शकतो. त्याप्रमाणेच त्यांचा फायदाही होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. जे उमेदवार दुसºया किंवा तिसºया क्रमांकावर आहेत. त्यांना पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्याएवढे मताधिक्य उदयनराजे मिळवून देऊ शकतात. त्यामुळे काहीजणांसाठी ही मोठी संधी आहे. फक्त उदयनराजेंना आपला प्रचार सांभाळून त्यांच्या प्रचारातही मदत करावी लागेल. निवडणूक विभागाला दोन निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार होता. हा खर्च काही प्रमाणात कमी होईल. लोकांना एकाचवेळी विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान करता येईल. भाजपच्या स्थानिक प्रबळ उमेदवाराचा उदयनराजेंचेही मताधिक्य वाढण्यात फायदा होईल.
दुसºया बाजूचा विचार केला लोकसभा विधानसभेसोबत झाली नसती तर काय झाले असते? पहिली बाब म्हणजे उदयनराजे आणि भाजपचे फार जमले नसते. जसे सोमवारच्या पक्षाच्या मेळाव्याकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली तशीच परिस्थिती पुढच्या काळात राहिली असती. दुसरी बाब म्हणजे उदयनराजेंना आमदारांच्या प्रचारात सक्रिय राहावे लागले असते. जर, ते प्रचारात उतरले नसते तर भविष्यात त्यांना मदत करायचे भाजपच्या नेत्यांनी टाळले असते. अशावेळी ना भाजपची मदत ना राष्ट्रवादीची सहानुभूती त्यामुळे स्वत:च्या ताकतीवरच त्यांना ही निवडणुकीची लढाई लढावी लागली असती.
सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे प्रचारात एकत्रच उतरतील. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला स्वतंत्रपणे शिवेंद्रराजे किंवा उदयनराजेंचा प्रचार करावा लागणार नाही. दोन्ही राजेंमुळे एकमेकांचे शत्रू झालेले कार्यकर्ते पुन्हा एकदिलाने एकत्र येतील, असे वाटते. याचा दोन्ही राजेंना फायदाच होईल. शिवेंद्रसिंहराजेंनी लोकसभेला उदयनराजेंना केलेली मदत विचारात घेता यावेळी पुन्हा दोघे एकमेकांना मदत करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.
कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना प्रचारात मोठी मदत केली होती. जावळी भागात त्यांना मताधिक्य मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे आता उदयनराजे त्याची परतफेड करणार का भाजपच्या उमेदवारासोबत राहणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
क-हाड उत्तर मतदारसंघात धैर्यशील कदम यांनी उदयनराजेंना मदत केली. आघाडी धर्म म्हणून त्यांनी मदत केली असली तरी पुढे कधी तरी उदयनराजेंची मदत होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मनोज घोरपडे विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांनी युतीच्या उमेदवाराला मदत केली. त्यांनी पक्षधर्म पाळला. आता उदयनराजे पक्षधर्म पाळणार की लोकसभेला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार? या यक्ष प्रश्न त्यांनाच सोडवावा लागणार आहे.
क-हाड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंसोबत फिरले, सभा घेतल्या; पण भाजपमध्ये गेल्यानंतर उदयनराजेंनी चव्हाण यांच्यावरच जोरदार टीका केल्याने ते आता त्यांना मदत करतील, असे काही वाटत नाही. याठिकाणी अतुल भोसले यांनाच त्यांची मदत होईल. त्यामुळे राजेंद्र यादव यांचा गटही अतुल भोसले यांच्यासोबत राहणार, असे दिसते.
वाई मतदारसंघात मकरंद पाटील स्वखर्चाने उदयनराजेंसाठी वाडी वस्त्यांवर फिरले. लोकसभेसाठी पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या, अशी विनवणी केली. आता त्यांच्याविरोधात भाजपमध्ये गेलेल्या मदन भोसले यांचे आव्हान असणार आहे. अशावेळी उदयनराजेंचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार? हे महत्त्वाचे आहे. तसे पक्ष बिक्ष त्यांना फार काही महत्त्वाचे वाटत नाही. मैत्री महत्त्वाची असे उदयनराजे सांगतात. त्यामुळे काही दिवसांतच मैत्री की पक्षाचे बंधन हे पाहावे लागणार आहे.
फलटण आणि माण खटावमधील चित्र अजून स्पष्ट नाही; पण जयकुमार गोरे यांना उदयनराजेंची मदत होणार, हे स्पष्ट आहे. फलटणमध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विचाराचा उमेदवार आणि माणमध्ये जयकुमार गोरे यांनाच त्यांची मदत होणार. त्यामुळे उदयनराजे मैत्री सांभाळणार का पक्षादेश, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारांनाही आता काय करायचे काय नाही याचे भान आले आहे. त्यामुळे आता त्यांची बारी आली आहे.
पक्षनिष्ठा की...मित्रप्रेम, आता निर्णय घ्यावाच लागेल
कोणाची मदत होवो किंवा न होवो...सर्वच पक्षांत मित्र आहेत. मैत्रीसाठी कायपण अशीच भावना असणाºया उदयनराजेंबाबत कोणाला मदत करायची, हा प्रश्न असणार आहे. त्यांनी काय करायचे, याचा निर्णय तेच घेणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पक्ष तर काही ठिकाणी मैत्री अशी भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.
एकत्र निवडणुकीमुळे फायदा-तोट्याचे गणित
विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेचीही पोटनिवडणूक लागल्यामुळे काही जणांना फायदा होणार आहे, तर काहींना तोटा होणार आहे.
निवडणूक वेगवेगळी लागली असती तर उदयनराजेंना सोयीस्कर भूमिका घेता आली असती; पण आता मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी अशाच भावनेतून राहावे लागणार आहे.
त्याबरोबरच नेत्यांचीही अंतर्गत मदत एकमेकांना घ्यावीच लागेल. त्यावेळी पक्षाची बंधने तुटून मैत्रीच्या आणाभाका अधिक घेतल्या जातात.