आता बस्स झाला कदमांचा ‘दम’!

By admin | Published: November 2, 2016 12:04 AM2016-11-02T00:04:53+5:302016-11-02T00:04:53+5:30

वसंत लेवे : आमदारांचं नाव सांगून नगरसेवकांचं तोंड बंद करणाऱ्यांना हिसका दाखवणारच

It's just a step! | आता बस्स झाला कदमांचा ‘दम’!

आता बस्स झाला कदमांचा ‘दम’!

Next

सातारा : ‘मी माझ्या घरच्या कामासाठी ‘पार्टी’कडे आग्रह धरत नव्हतो, तर प्रभागातील लोकोपयोगी कामांसाठी मी वारंवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यांनी मात्र आम्हाला खिजगिणतीतही धरले नाही. कोणत्याही कामात पक्षप्रतोद अविनाश कदम हे आडवे येत होते. आमदारांच्या खूप जवळचे आहोत, असे भासवून त्यांनी आघाडीतल्या नगरसेवकांना वारंवार दटावणे सुरूच ठेवले, त्यांचा ‘दम’ आता बस्स झाला. कदम नगराध्यक्षपदासाठी जरी उभे राहिले असते तरी मी त्यांच्या विरोधातच अर्ज भरला असता,’ असे सडेतोड मत माजी नगरसेवक व प्रभाग क्र. १८ मधील सातारा विकास आघाडीचे उमेदवार वसंत लेवे यांनी व्यक्त केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीसोबतचा अनेक वर्षांचा घरोबा मोडून वसंत लेवे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीत दाखल झाले आहेत. वसंत लेवे एकवेळ अपक्ष म्हणून लढतील, परंतु सातारा विकास आघाडीत जाणार नाहीत, अशी चर्चा शहरात सुरू होती. मात्र, या चर्चेला धूळ चारत वसंत लेवे चक्क उदयनराजेंसोबत गेल्याने सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात याची जोरदार चर्चा झाली.
‘नविआ’शी असणारा इतक्या वर्षांचा घरोबा सोडण्यासाठी एवढं काय कारण झालंं?, याची चर्चाही शहरात सुरू आहे. याबाबत लेवे यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांच्यामुळे दुखावल्याने लेवे यांनी आघाडी सोडल्याचे स्पष्ट केले.
‘आम्ही सुचविलेल्या प्रत्येक कामात ‘नविआ’चे पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी खो घातला. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे तक्रार केली तर ते उलट अविनाशशी बोलतो, असं म्हणून बोलणे टाळायचे. आमदारांच्या पुढे-मागून करून त्यांचा निधीही कदम यांनी पळवला.
इतर नगरसेवकांना तो मिळू दिला नाही. आमची कोंडी होत असताना आमचे नेते मात्र ठराविक लोकांच्यावर विश्वास टाकून बसले होते. माझी पत्नी मुक्ता लेवे नगराध्यक्ष असताना त्यांना सर्वसाधारण सभेची तारीख ठरविण्याचाही अधिकार नव्हता. नगराध्यक्षांना यांनी बाहुले बनवले होते. आमदारांचं नाव पुढे करून कदमांनी ‘नविआ’तल्या नगरसेवकांची तोंडे बंद केली होती,’ असेही लेवे पुढे बोलताना म्हणाले.
आमदार निधी ठराविक लोकांच्याच हाती दिला गेल्याचे सांगताना वसंत लेवे म्हणाले, ‘शहरासाठी असणारा वैशिष्ट्यपूर्ण निधी ठराविक प्रभागांतच वापरला गेला. आमदारांना आम्ही त्याबाबत फोन करून विचारला तर त्यांनी फोनच उचलला नाही. ज्यांनी निधी पळवला, त्यांच्या पेठांतूनच आमदारांना विधानसभेला कमी मते पडली. तरीही हीच मंडळी आमदारांजवळ चिकटून राहिली. त्यामुळे नाईलाजाने आघाडीला सोडचिठ्ठी दिली.’ (प्रतिनिधी)
खासदारांना स्पष्टच सांगितलं : लेवे
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मनात खदखद होती. अविनाश कदम ते जिथे कुठे उभे राहतील, तिथे त्यांच्या विरोधात उभं राहायचंच. मनोमिलन झालं तरीही मी कुठलीही तडजोड करणार नाही, असंही मी खासदार उदयनराजे भोसले यांना स्पष्टपणे पूर्वीच सांगितलं होतं... अन् आता ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठीच मैदानात उतरलोय.
अपयश झाकण्यासाठी प्रयत्न : कदम
आमच्या नगर विकास आघाडीने लेवेंना सव्वा वर्षे नगराध्यक्षपद दिलं होतं. स्थायी समितीतही त्यांचा सहभाग होता. वसंत लेवे यांच्या पत्नी यांच्याकडे या पदांसोबतच ‘नविआ’ने आरोग्य सभापतीपदही दिले होते. त्यांच्या प्रभागातील रस्तेही आम्हीच मंजूर केले. आपण जसे चष्म्यातून पाहतो, जग आपल्याला तसेच दिसते. आपलं अपयश झाकून ते दुसऱ्याच्या माथी मारण्याचा वसंत लेवे केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ते आपला नाकर्तेपणा दडवत आहेत.
 

Web Title: It's just a step!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.