गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:36+5:302021-04-10T04:38:36+5:30
सातारा : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन व्यवसाय कुठे सुरू होतो न होतो तोच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू ...
सातारा : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन व्यवसाय कुठे सुरू होतो न होतो तोच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि प्रशासनाने ब्रेक चेन ही मीहिम हाती घेतली. या मोहिमेमुळे पुन्हा एकदा व्यापारीवर्ग अडचणीत आला असून, घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. संपूर्ण लॉकडाऊनऐवजी शासनाने निर्बंध आणखी कठोर करावेत, अशी अपेक्षा आता व्यापारीवर्गातून होत आहे.
सातारा जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. दिवाळीच्या तोंडावर काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाकडून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आला. यानंतर सर्व उद्योग व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाले. अनेकांच्या कुटुंबाची गाडी कशीबशी रुळावर आली. दुकाने, व्यापार सुरू होऊन कुठे पाच-सहा महिने होत आहेत तोवर पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि शासनाने लॉकडाऊनचा पर्याय पुढे आणला.
या लॉकडाऊनची झळ व्यापारी, उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन इतकेच नव्हे, तर घरखर्च चालवायचा कसा असा प्रश्न अनेकांच्या पुढे उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत 'गळ्यातील चेन मोडायची वेळ आली आणि कसली ब्रेक द चेन' अशा भावना देखील व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय
(कोट)
कोरोना रोखण्यासाठी सर्व दुकाने बंद करणे, लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत आणखीन कठोर निर्बंध करावेत. दुकानांची वेळ कमी करावी. परंतु, ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावू नये.
- सुरेखा मोरे, शाहूपुरी
(कोट)
पहिल्या टप्प्यात दुकाने पाच ते सहा महिने सुरू राहिली. यानंतर पुन्हा एकदा शासनाने कठोर निर्बंध लागू केले. त्यामुळे आमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. देणी भागवायची कशी, हा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.
- नीलिमा पाटील, सातारा
(कोट)
शासनाने दुकानांवर वेळेचे बंधन ठेवावे. मात्र, अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. हजारो कुटुंबीयांचे हातावरचे पोट आहे. आता व्यवसायच बंद झाल्याने पुन्हा एकदा अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
- भारती आगवणे, विलासपूर
(चौकट)
सात महिने सुरू राहिला व्यवसाय
कर्ज कसे फेडायचे ?
पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जवळपास सात महिने जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू राहिली. या कालावधीत उसनवारी घेतलेले पैसे, बँकांचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार सर्व देणी हळूहळू भागविली. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने बिकट बनली आहे. आता छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांची गाडी कधी रुळावर येणार? हा मोठा प्रश्न आहे, असे मत एका व्यापाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले.
(चौकट)
२१० दिवस जिल्ह्यात सुरू राहिली दुकाने.