भावाला जामीन दिल्यानेच माझ्यावर ही वेळ !
By admin | Published: January 17, 2017 12:13 AM2017-01-17T00:13:13+5:302017-01-17T00:13:13+5:30
जयकुमार गोरे : दहिवडीच्या सभेत बंधू शेखर गोरे यांच्यावर कडाडून टीका; खोटा गुन्हा ही आयुष्यातील दुर्दैवी घटना
दहिवडी : ‘लाखो रुपये खर्च करून मी त्यावेळी बनावट नोटांच्या आरोपातून जामीन मिळवून देण्याचे पाप केले नसते तर माझ्यावर आज ही वेळ आली नसती, या शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी बंधू शेखर गोरे यांच्यावर कडाडून टीका केली. दरम्यान, जिल्ह्यात वाढत चाललेले वर्चस्व आणि जिल्हा बँकेतील हस्तक्षेप नको असल्यानेच रामराजे यांच्या मदतीने माझ्यावर खोट्या केसेस सुरू आहेत. माझ्यावर आणखी पन्नास केसेस झाल्या असत्या तरी चालल्या असत्या; पण शरीर सुखाची मागणी ही माझ्यावर झालेली खोटी केस माझ्या आयुष्यातील दुर्दैवी घटना आहे,’ अशी खंत आमदार गोरे यांनी व्यक्त केली.
दहिवडी येथील बाजारपटांगणावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कऱ्हाड बाजार समिती सभापती हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे, भीमराव पाटील, धैयशील कदम, दिगंबर आगवणे, डॉ. सुरेश जाधव, मानाजी घाडगे, अजय धायगुडे, गुरुदेव बरदाडे, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
जयकुमार गोरे यांनी शेखर गोरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘या माणसाने पात्यात कमावलं ते मातीत घालवलं. हे जेथे जातील तेथे पराभव होतो. आमच्याकडे आले आमचा पंचायत समितीत पराभव झाला. त्यानंतर जिल्हा बँकेत तात्यांचा पराभव. हे जाणकरांकडे होते तो पर्यंत त्यांनाही मंत्रिपद नव्हते. आता, राष्ट्रवादीतही ६४ मतांनी पराभव झाला. जिकडे जाईल, तिकडे पराभव. म्हसवडच्या सभेत म्हटलं, माण तालुक्याला दोन आमदार मिळाले असते; पण भावामुळे पराभव झाला. जिल्हा बँकेला विधानसभेला भाऊ आठवला नाही. जो माणूस स्वत:च्या वडिलांवर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात बसतो त्यांनी भावालाही सोडले नाही.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘हजारो टन कोळशातून एक हिरा मिळतो. तो जयकुमार गोरे यांच्या रूपाने मिळाला आहे. आमदार गोरे हे स्वच्छ राजकारण करणारे मित्र आहेत. म्हसवडला कामे करूनही सत्ता मिळाली नाही ही गोष्ट मनाला चटका लावणारी होती.’ यावेळी धैयशील कदम, भीमराव पाटील, सुरेश जाधव, अॅड. गुंडगे, अर्जुन काळे यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी सुरेश जगदाळे, गौरव सावकार, नीलेश माने, अजित भोसले, महेश गुरव, सभापती अतुल जाधव, अरुण गोरे भगवान गोरे, सोनिया गोरे, अॅड. भास्करराव गुंडगे, एम. के. भोसले, नितीन दोशी, सोमनाथ भोसले, दादा काळे, प्रशांत वायदंडे, विशाल बागल, निवृत्ती जगदाळे, नगराध्यक्षा साधना गुंडगे, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, धनाजी जाधव, सतीश जाधव, बाबा हुलगे, अजित दडस, रवी संकुडे, शिवाजी शिंदे, महेश कदम व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
... तर स्वत:ला गोळी घालून घेईन
‘ज्यांनी दोन लाखांचे एक काम आणले नाही, ज्या गावात कमान. त्या गावचे वाटोळे झाले. ज्याला ८७ रुपयांचा नेट पॅक टाकायला पैसे नव्हते त्याच्या खात्यात २५ लाख कसे. माझ्यावर गुन्हा दाखल करताना रामराजे यांचे व चपराशी यांचे किती फोन झाले ते ही तपासा. प्रत्येक निवडणुकीला जयकुमार ऐकत नाही म्हटलं की खोट्या केसेस दाखल करतात. जो पर्यंत माझ्यावर जनतेचा विश्वास आहे तो पर्यंत मला भीती नाही. मी दोषी असेन तर स्वत: गोळी घालून घेईन. ही कमरेखालची लढाई असून, मी काय शिष्टाचाराने वागायचा ठेका घेतला नाही. आपणावर जर केसेस दाखल कराव्या लागण्याची वेळ आली तर ५० युवक पुढे येतील. आता विचाराची लढाई संपली आहे. एकदा मैदानात या मग दावतो जयकुमार काय आहे ते, असे आवाहन त्यांनी रामराजे यांना केले.
जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची हजेरी
दहिवडी येथे झालेल्या सभेत जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कॉँग्रेस पदाधिकारी सभेला हजर झाल्याचे पहावयास मिळाले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सभेला कार्यर्त्यांची संख्याही लक्षणीय होती.