हप्ता भरायला उशीर झालाय... घरी येतोय वसुलीवाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:04+5:302021-07-28T04:41:04+5:30

प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड काळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. पैसे येण्याचा मार्ग खडतर झाला तरी ...

It's too late to pay the installment ... Vasuliwala is coming home! | हप्ता भरायला उशीर झालाय... घरी येतोय वसुलीवाला!

हप्ता भरायला उशीर झालाय... घरी येतोय वसुलीवाला!

Next

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड काळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. पैसे येण्याचा मार्ग खडतर झाला तरी खर्चाची गाडी मात्र सुसाटच होती. कुटुंबावर येणाऱ्या संकटांना झेलण्यासाठी काहींनी खासगी बँकांमधून कर्जे काढली. ती कर्जे वेळेवर न भरल्याने वसुली अधिकारी भल्या सकाळी कर्जदारांच्या घरीच जाऊन बसायला लागले आहेत. परिणामी अवघ्या कुटुंबावर दडपण येऊ लागलं आहे.

सुमारे दीड वर्षे कोरोनाने मुक्काम ठोकल्यानंतर अनेकांची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. कोणी व्यवसाय बंद झाल्याने तर कोणाची नोकरी गेली म्हणून कर्ज काढण्याची वेळ सामान्यांवर आली. कोविडची परिस्थिती आज ना उद्या सामान्य होईल आणि घेतलेले कर्ज सहज फेडू अशी धारणा कर्ज घेणाऱ्यांची होती. मात्र, कोविडचा मुक्काम वाढला आणि कर्ज फेडण्याची गणितेच बिघडू लागली. कुटुंबात याविषयीची माहिती देऊन त्यांचा ताण वाढविण्यापेक्षा बाहेरच्याबाहेर हे प्रकरण निकाली काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेक कुटुंबप्रमुखांना वसुली अधिकाऱ्यांचे शाब्दिक वार सोसवेनात अशी अवस्था झाली आहे. त्यांना टाळणं आणि झेलणं दोन्ही मुश्किल झाल्याने अनेक जण तणावग्रस्त आहेत.

चौकट :

कुटुंबीयांसमोरच होतोय विनंत्याविनविण्यांचा खेळ!

कुटुंबातील ज्येष्ठ आणि मुलांपुढे आर्थिक अडचण व्यक्त न करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पण खासगी बँकांचे लोक भल्या सकाळीच घरात येऊन बसत असल्याने कुटुंबांपुढेच आर्थिक विवंचनेचा पाढा वाचण्याची वेळ येत आहे. बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्गक्रमण करताना येणाऱ्या अडचणींपासून कुटुंबीयांना दूर ठेवणाऱ्या कुटुंबप्रमुखाला या परिस्थितीला सामोरे जाणेही जीवघेणे वाटू लागले आहे.

वसुली अधिकारी म्हणतात...!

कोरोनाने सगळ्यांनाच आर्थिक अडचणीत आणलं आहे. त्यामुळे सुमारे वर्षभर अनियमित असणाऱ्या हप्त्यांकडे आम्ही दुर्लक्ष केलं. पण हॉटेलिंग, पर्यटन यासह नवनवीन गोष्टी घेण्यासाठी कुटुंब आर्थिक सक्षम असेल तर घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यापोटी त्यांनी पैसे भरणे अपेक्षित आहे. काही कर्जदारांनी कॉल कट करणे, नंबर बदलणे, अर्वाच्च भाषेत बोलणे सुरू केल्यानंतर नाईलाजाने आम्हाला घरी जावं लागलं. ज्यांची बेताची परिस्थिती आहे आणि जे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत त्यांच्या घरी आमची टीम जात नाही, असे स्पष्टीकरण एका खासगी बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने दिले.

पॉर्इंटर

यासाठी घेतले होते कर्ज

घरातील आजारपण

पहिले कर्ज फेडण्यासाठी

मुलांची शैक्षणिक फी भरण्यासाठी

बँकेतील थकलेले हप्ते भरण्यासाठी

व्यवसायात भांडवल गुंतविण्यासाठी

कोट :

सरकारी बँकेतील कर्ज घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तातडीची निकड म्हणून खासगी बँकांकडे कर्जे घेतली गेली. कोविड काळात ती भरण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर कर्जदाराच्या घरात जाऊन बसणे अयोग्य आहे. कारण काहीही असलं तरी कुटुंबांपुढे कर्जदाराचा पाणउतारा करणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही, हे नक्की.

- विजय मोरे, व्यावसायिक सातारा

Web Title: It's too late to pay the installment ... Vasuliwala is coming home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.