‘सोशल मीडिया’वर फिरला इवलासा ससा
By Admin | Published: May 19, 2017 12:19 AM2017-05-19T00:19:20+5:302017-05-19T00:19:20+5:30
‘सोशल मीडिया’वर फिरला इवलासा ससा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : हल्ली सोशल मीडियावर काय येईल ते सांगता येत नाही. असाच एक किस्सा बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. इवलासा ससा चुकून सरकारी कार्यालयात घुसला.. अन् नंतर पाहता-पाहता अख्ख्या सोशल मीडियावर फिरला.
साताऱ्याच्या कृष्णानगरमधील गुण नियंत्रण विभागात शाखा अभियंता वर्षा ससाणे या संगणकावर काम करत असताना अचानक त्यांच्या कम्पार्टमेंटमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. कार्यालयातील सर्वजण काय आहे, याची चौकशी करू लागले. प्रथमत: ते मांजर असल्याचा कयास बांधला गेला.
मात्र, ते मांजर नसून ससा असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. घाबरलेला ससा कार्यालयात इकडून तिकडे सैरावैरा धावू लागल्याने कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद केले गेले. त्याचा शोध घेतला असता तो एका केबीनमध्ये घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पायाला जखम झाल्याचे दिसले.
संबंधित विभागातील सहकाऱ्यांनी ससा जखमी असल्याचे पाहून त्याला बाहेर न सोडता कार्यालयातच कोंडून ठेवले. बाहेर सोडले तर कुत्रे त्याचा फडशा पाडतील म्हणूनजवळच असलेल्या वनविभागाच्या कार्यालयात सशाला घेऊन वर्षा ससाणे या गेल्या. जखमी असलेल्या सशाला त्यांनी वनविभागाच्या स्वाधीन करून त्याची जखमी वन्यप्राणी, पक्षी रजिस्टरमध्ये नोंद केली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सशाला उपचारासाठी घेऊन गेले. तेव्हा आम्ही त्याची योग्य प्रकारे काळजी घेणार असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या साऱ्या घडामोडी दिवसभर सोशल मीडियावर फिरल्या.
पाण्यासाठी परिसरात दाखल..
दुपारच्या सुमारास ससा पाण्याच्या शोधासाठी आला असावा, असा कयास येथील कर्मचाऱ्यांनी बांधला आहे. यापूर्वी या परिसरात सशे फिरत असल्याचे काहींनी पाहिले आहे. पाणी पिण्यासाठी आले असता कुत्र्यांनी पाठलाग केला असावा आणि पळताना त्याच्या पायाला जखम झाली असावी, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही आसपासच्या परिसरातील जखमी प्राणी, पक्षांचे जीव वाचवून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे, याची नोंदही जखमी ‘वन्यप्राणी, पक्षी रजिस्टर’मध्ये ससाणे यांच्या नावे आहे.