इवल्याशा दप्तरापुढं एसटी हतबल!

By admin | Published: September 3, 2015 10:09 PM2015-09-03T22:09:01+5:302015-09-03T22:09:01+5:30

तब्बल चार तास बसेस रोखल्या : सोनगावात प्रशासनाची उडाली तारांबळ; बसफेरी वाढविण्याचे दिले आश्वासन

Ivleisa Dattara after the ST! | इवल्याशा दप्तरापुढं एसटी हतबल!

इवल्याशा दप्तरापुढं एसटी हतबल!

Next

सातारा/शेंद्रे : वेळ सकाळी सहाची. सोनगाव तर्फ सातारा बसस्थानकावर नेहमीप्रमाणे शे-दीडशे महाविद्यालयीन विद्यार्थी एसटी बसची वाट पाहत उभारलेले. पण हात करूनही एकही बस थांबत नव्हती. वेळ सरत होती. कॉलेजला पोहोचायला उशीर होत होता. अखेर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत पाच एसटी बस रोखून धरल्या. तब्बल चार तास इवल्याशा दप्तरापुढं एसटी हतबल झाली अन् अखेर सुरळीत सेवा देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सोनगाव येथील सुमारे दीडशे-दोनशे विद्यार्थी शहरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येतात. एसटी पास असल्यामुळे विद्यार्थी बसस्थानकावर बसची वाट पाहत उभे असतात. मात्र, काही दिवसांपासून या बसथांब्यावर एसटी बस थांबत नव्हती. त्यामुळे महाविद्यालयाची सकाळी सातची वेळ गाठता येत नाही. परिणामी महत्त्वाचे तास बुडून शैक्षिणिक नुकसान होत आहे. कित्येक दिवस मनात साचून राहिलेला असंतोष आज उफाळून आला अन् विद्यार्थ्यांनी तब्बल चार तास रस्ता अडवून धरला.
एसटी पासचा उपयोग महिन्यातून पंधरा दिवसही होत नाही. खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अनेक दिवसांपासून चाललेल्या या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सोनगाव येथे रास्ता रोको करून दोन्ही बाजूकडील एस बस रोखून धरल्या. अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बसफेऱ्या वाढविण्याचे आश्वासन दिल्यानंतर बस मार्गस्थ झाल्या. (प्रतिनिधी)

आम्हाला नंबर देता येत नाही...
तब्बल चार तास विद्यार्थ्यांनी बस रोखल्या होत्या. दरम्यान, वाहनचालक, वाहकांना अधिकाऱ्यांना फोन करून बोलवा, नाही तर आम्हाला नंबर द्या, असे सांगितले. पण, ‘अधिकाऱ्यांचा नंबर आम्हला देता येत आणि दहा-अकरा वाजल्याशिवाय अधिकारी आॅफिसला येत नाहीत. त्यामुळे अकरा वाजेपर्यंत काही होऊ शकत नाही, असे उत्तर त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

वाहक-चालक रमले वाचनात...
एकीकडे कॉलेजला पोहोचण्यासाठी उशीर होत असल्यामुळे त्रस्त झालेले विद्यार्थी वाहक-चालकांना अधिकाऱ्यांना बोलाविण्याची विनंती करत होते, तर दुसरीकडे वाहक-चालक मात्र रस्त्यावर फतकल मारुन पेपर वाचनात रमले होते. कुणी तंबाखू मळत होते तर कुणी पादचाऱ्यांबरोबर गप्पा
मारत उभे होते.


ट्रिपल सीट प्रवास
विद्यार्थ्यांनी पाच एसटी बस रोखून धरल्या होत्या. बसमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच नोकरदारमंडळीही होती. आता पुढे जायला उशीर होणार, हे गृहीत धरून काहींनी खासगी वाहनाचा आधार घेतला तर काही जणांनी दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन प्रवास केला.

Web Title: Ivleisa Dattara after the ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.