पक्षी वाचवासाठी पंधरा गावांत जागर, वन विभागाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:11 PM2020-11-09T17:11:34+5:302020-11-09T17:16:17+5:30
forestdepartment, wildlife, birds, sataranews निसर्गाच्या साखळीत प्राणी व पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वन विभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत. पक्षी सप्ताहानिमित्त आगाशिव डोंगरात प्रात्यक्षिक घेत १५ गावांत पक्षी वाचवा निसर्ग वाचवाचा संदेश देण्यात आला.
मलकापूर : निसर्गाच्या साखळीत प्राणी व पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वन विभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत. पक्षी सप्ताहानिमित्त आगाशिव डोंगरात प्रात्यक्षिक घेत १५ गावांत पक्षी वाचवा निसर्ग वाचवाचा संदेश देण्यात आला.
सध्या वाढणारी सिमेंटची जंगले, वृक्षतोड व पर्यावरणातील बदलामुळे अनेक पक्षी नामशेष होत आहेत. पक्ष्यांविषयी समाजामध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने पक्षीमित्र पक्षी सप्ताह साजरा करावा म्हणून अग्रेसर होते. त्यांच्या मागणीला शासनाने संमती देऊन ५ नोव्हेंबर मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबरला डॉ. सलीम अली यांची जयंती, हे औचित्य साधून हा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. या सप्ताहानिमित्त येथील वनविभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
आसपासच्या पंधरा गावांत पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवली आहे. पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण, चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये, एक पक्षी की जान बचाएं, पक्षी है खेतों की शान, जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाव जीवन बचाव, असे अनेक संदेश देणारे फलक गावोगावी लावले आहेत.
आगाशिव डोंगरावर जखिणवाडी वनक्षेत्रात साताऱ्याचे सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, कऱ्हाडचे वनक्षेत्रपाल अर्जुन गंभरे, सर्व वनरक्षक, वनपाल, ग्रामस्थ व पर्यटक यांच्या उपस्थितीत वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पक्ष्यांची नावे, ओळख, राहणीमान याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.
विविध पक्ष्यांचे निरीक्षण
पक्षी सप्ताहाअंतर्गत गावोगावी विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. घार, मोर लांडोर, बुलबुल, खंड्या, पोपट, सुतारपक्षी, चिमणी, पारवा आदी पक्ष्यांचे निरीक्षण केले. जमिनीवर आढळणारे, झाडावर राहणारे तसेच पाण्यावरती परिसंस्थेवर अवलंबून असणारे पक्षी हे संपूर्ण पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि निसर्गातील जैवविविधता संपन्न ठेवण्यासाठी उपयुक्त असतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.