पालिकेच्या पथदिव्यांचा कऱ्हाडात ‘झगमगाट’ !
By admin | Published: January 24, 2016 12:10 AM2016-01-24T00:10:08+5:302016-01-24T00:38:29+5:30
बदलल्या काचा अन् ट्यूब : पथदिव्यांची डागडुजी; शहरातील सहा ठिकाणचे हायमास्टची दुरुस्ती
कऱ्हाड : शहरातील परिसराबरोबर मुख्य मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई असावी, म्हणून वीजवितरण कंपनीने शहरातील रस्त्यांसह अंतर्गत भागात विद्युत खांब व पथदिवे उभारले. व त्यांच्या देखभालीची जबाबदारी ही पालिकेवर टाकली. मात्र, तुटलेल्या स्ट्रीट लाईटमधून व फुटलेल्या काचांमधून पडणाऱ्या अंधुक प्रकाशामुळे शहरातील अनेक ठिकाणी उजेड असूनही अंधाराची अवस्था निर्माण झाली होती. याकडे पालिकेकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे याबाबत ‘लोकमत’ने शहरातील स्ट्रीट लाईट व फुटलेल्या मर्क्युरीबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर शहरातील बंद पडलेल्या मर्क्युरीचे व दुभाजकावरील काचा फुटलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुख्य चौकासह अंतर्गत पेठांमध्ये वीजवितरण व पालिकेतर्फे मर्क्युरी तसेच फ्यूजबॉक्स, ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. त्याची नियमित देखभालीची जाबाबदारी सांभाळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभारण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून शहरतील पथदिवे व हायमास्ट दिवे दुरुस्तीअभावी तसेच चालू होते.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कृष्णानाका, जनता बँकेसमोरील चौक, दत्तचौक तसेच महात्मा फुले चौक या मार्गावरील पथदिव्यांमधील गेलेल्या ट्युबस् व काचा बदलून नवीन काचा व ट्युब बसविण्यात आलेल्या आहेत. शहरात लावण्यात आलेल्या मर्क्युरीवरील काचा फुटलेल्या असल्याने त्यामध्ये असलेला बल्ब हा लवकर खराब होतो. त्यांची दुरुस्ती वेळच्या वेळी न केली गेल्यास त्यामुळे पुढे याचा खर्चही वाढत जातो. हा खर्च पालिकेला न परवडणारा आहे. अशात पालिकेतर्फे काही वर्षांपूर्वी शहरातील व वाढीव हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी प्रकाशाची उत्तम सोय करत मोठ्या रस्त्यावर व चौकाचौकात जवळपास ३ हजार २०० सोडियम व्हेपर लॅम्पस् व मर्क्युरी दिवे व सात ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले. त्यांच्या दुरुस्तीची सध्या कामे हाती घेण्यात आली आहेत.
पालिकेकडून २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात नवीन इलेक्ट्रिक दिवे घेणे पोल या खात्यावर ३३ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. शहरातील स्ट्रीट लाईटची तसेच म्युनिसिपल मिळकतीची एनर्जी लाईटची बिले यासाठी पालिकेकडून ९० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. खांब हलविण्यासाठी सुधारित अंदाजपत्रकात २० लाख रुपये तसेच येणाऱ्या अंदाजपत्रकात तब्बल अडीच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.एवढ्या मोठ्या रक्कमेची तरतूद करून देखील त्याची पूर्तता केली जात नव्हती. मात्र, आता पालिकेकडून शहरातील पथदिव्यांची व त्यावरील फुटलेल्या काचांच्या मर्क्युरीच्या दुरुस्तीची केली जात असून, लवकरच पालिकेच्या स्वच्छ पथदिव्यांचा झगमगाट नागरिकांना दिसणार आहे. (प्रतिनिधी)