विधवा पुनर्विवाह अडकला वादाच्या भोवऱ्यात, पहिली पत्नी असताना करत होता दुसरा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:38 PM2022-06-29T16:38:45+5:302022-06-29T17:59:01+5:30
दुसरा विवाह केल्याने गुन्हा दाखल
सातारा : सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेला विधवा पुनर्विवाह आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहिली पत्नी असताना दुसरा विवाह केल्याप्रकरणी पुनर्विवाह करणाऱ्या पतीवरच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रमेश शंकर शिंदे (वय ५२, रा. खेड, ता. सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जकातवाडी येथे रविवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी शैला मोरे आणि रमेश शिंदे यांचा विधवा पुनर्विवाह पार पडला. हा ऐतिहासिक विवाह सोहळा मानला जात होता. या सोहळ्याला ग्रामस्थांसह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या जोडप्याने पुनर्विवाह करून क्रांतिकारी पाऊल टाकल्यामुळे सर्वत्र त्यांचे काैतुक केले जात असतानाच, या प्रकरणाने मंगळवारी वेगळे वळण घेतले. रमेश शिंदे यांची पहिली पत्नी रोहिणी रमेश शिंदे (वय ४८, रा. खेड, ता. सातारा) यांना पतीने हे लग्न केल्याचे समजताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणे गाठले.
आमचा घटस्फोट झाला नसताना पतीने शैला मोरे (रा. नुने, ता. सातारा) हिच्याशी दुसरे लग्न केल्याचे त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी रोहिणी शिंदे यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार सन २००० ते २६ जून २०२२ या कालावधीत पती रमेश शिंदे यांनी वेळोवेळी घरगुती काैटुंबिक कारणावरून मारहाण, शिवीगाळ केली. तसेच शारीरिक, मानसिक छळ केला. आमचा घटस्फोट झाला नसताना सुद्धा त्यांनी जकातवाडी येथे दुसरा विवाह केला. या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश शिंदेंवर गुन्हा दाखल केला आहे.
क्रांतिकारी पाऊल म्हणून दिला पाठिंबा...
विधवा पुनर्विवाह करताना वराची म्हणे, तोंडी चाैकशी करण्यात आली. त्यावेळी वराने ‘मी अनेक वर्षे स्वतंत्र राहत असून, आमच्यात कोणताही संपर्क नाही,’ अशी माहिती त्यांनी काही ग्रामस्थांना दिली. दोघांची पसंती झाल्यानंतर ते जकातवाडी ग्रामस्थांकडे आले. त्यानंतर एक क्रांतिकारी पाऊल म्हणून या लग्नाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला, अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे.