ओढ्यावरील अतिक्रमणामुळे जखिणवाडी रस्ता तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:14 AM2021-08-02T04:14:47+5:302021-08-02T04:14:47+5:30
मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार ...
मलकापूर : महामार्ग ते जखिणवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तीन दिवस बंद होता. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे या ओढ्याचे पाणी तीन फुटांनी रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. या रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.
महामार्गावरून जखिणवाडीसह आगाशिव डोंगर व ऐतिहासिक लेण्यांकडे जाण्यासाठी मळाईदेवी पतसंस्था ते जखिणवाडी हा जवळचा रस्ता आहे. इतर गावांमधून येणाऱ्या पर्यटकांसह या भागातील शेतकऱ्यांना सोयीस्कर अशा या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमीन देऊन डांबरीकरणही केले आहे. याच रस्त्यालगत आगाशिव डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक ओढा आहे. या ओढ्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झाले होते. यापूर्वी शेतकऱ्यांची सोय व पर्यटनाला चालना देण्यासाठी यापूर्वीच्या सरपंचांसह सदस्यांनी काही अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ओढ्यावरच अतिक्रमण करत आडमुठे धोरण स्वीकारल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून रस्त्यालाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गेल्या आठवड्यात संततधार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. सलग पडत असलेल्या पावसाने या ओढ्यालाही पूर आला होता. पुराचे पाणी तीन फुटाने रस्त्यावरून वाहत असल्यमुळे तीन दिवस हा रस्ता वाहतुकीस बंद केला होता. काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. प्रशासनाने लक्ष घालून या ओढ्यावरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ करत आहेत.
चौकट
एक किलोमीटरसाठी सहा किलोमीटर प्रवास
महामार्गावरून जखिणवाडीला जाणाऱ्यांसाठी या रस्त्याने साधारणतः केवळ एक किलोमीटर अंतरात पोहोचते. मात्र या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कसरत करत प्रवास करण्यापेक्षा कृष्णा रुग्णालयाकडून किंवा नांदलापुरातून सहा किलोमीटर लांबून प्रवास करावा लागत आहे.
चौकट
अर्जावर अर्ज......पण हात रिकामेच
या ओढ्यावर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदारांसह शासन दरबारी अनेकवेळा अर्जावर अर्ज केले आहेत. मात्र प्रत्येकवेळी संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केवळ आश्वासनच दिले आहे. या मुसळधार पावसाने झालेल्या हाहाकाराने तर यांचे डोळे उघडणार का? असा सवाल ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
फोटो ०१मलकापूर
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)
010821\img_20210724_131436.jpg
फोटो कॕप्शन
महामार्ग ते जखिणवाडी रस्त्याकडेने जाणाऱ्या ओढ्यावर कांही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलून नेहमीच रस्त्यावरून पाणी वाहत असल्यमुळे पर्यटकांसह शेतकरी व ग्रामस्थांना हकनाक त्रास होत आहे. (छाया-माणिक डोंगरे)