जखीणवाडी, नांदलापुरात हाणामारी--ग्रामस्थांनीच दिले पोलिसांना संरक्षण!
By admin | Published: March 11, 2015 11:57 PM2015-03-11T23:57:08+5:302015-03-12T00:02:53+5:30
रंगपंचमीचा बेरंग : ग्रामस्थ-पोलिसांमध्ये चकमक; तीन वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारी
रंगपंचमीचा बेरंग : ग्रामस्थ-पोलिसांमध्ये चकमक; तीन वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारी
मलकापूर : जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी रंगोत्सवाच्या यात्रेत रंग उडविण्याच्या कारणावरून पोलीस व ग्रामस्थांत राडा झाला. त्यामुळे रंगपंचमीचा तर बेरंग झालाच. त्याचबरोबर जखीणवाडीच्या आदर्श वाटचालीलाही गालबोट लागले, तर दुपारी नांदलापुरात महिलेच्या अंगावर रंग टाकल्याच्या कारणावरून वाद झाला. तसेच सायंकाळी रंगपंचमीसाठी पाण्याचा पाईप वापरल्याच्या कारणावरून जखीणवाडीत पुन्हा राडा झाला.
जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी मळाईदेवीची यात्रा होती. त्यानिमित्त मानाच्या बैलगाड्यांतून रंग उधळत बैलगाड्या पळविण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार बैलगाड्यांतील मानकरी रस्त्याच्या दुतर्फा उभे असणाऱ्या यात्रेकरूंवर, तर यात्रेकरू मानकऱ्यांवर रंग उधळत असतात. बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी गावकरी अन् पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर रंगोत्सव सोडून ग्रामस्थ मिळेल त्या दिशेने पळून गेले. दरम्यान, त्याचवेळी नजीकच्या नांदलापूर येथे महिलेच्या अंगावर रंग उडविल्याच्याकारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील सुमारे पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. त्यात सोपानराव लावंड यांच्या डोक्याला गंंभीर दुखापत झाली आहे. तसेच दादा लावंड यांचा हात दुखावला आहे. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदलापुरातील गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविली असतानाच जखीणवाडीत पुन्हा रंगपंचमीसाठी पाण्याचा पाईप घेतल्याच्या कारणावरून झिमरे व पवार या दोन भावकीत मोठा वाद झाला. त्यामुळे जखीणवाडी परिसरास बुधवारी जणू पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ग्रामस्थांनीच दिले पोलिसांना संरक्षण!
जखीणवाडीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांच्या अंगावर काही तरुणांनी रंग टाकला. त्यावेळी संतापलेल्या पोेलिसांनी संबंधित युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा रंगोत्सवासाठी जमलेले ग्रामस्थही पोलिसांच्या अंगावर धावून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील काही सूज्ञ नागरिकांनी पोलिसांभोवती तत्काळ कडे करून त्यांना बंदोबस्तात बाहेर काढले.