‘जंगलमॅन’चे डोळे उजळले!

By admin | Published: March 31, 2015 10:24 PM2015-03-31T22:24:40+5:302015-04-01T00:05:34+5:30

मोफत शस्त्रक्रिया : ‘नातेवाइकां’कडून भरभरून ‘उतराई’

Jangalman eyes shine! | ‘जंगलमॅन’चे डोळे उजळले!

‘जंगलमॅन’चे डोळे उजळले!

Next

सातारा : जंगलात एकटा राहून प्रतिकूलतेशी झगडणाऱ्या, निसर्गमित्रांना जंगलवाचन शिकवणाऱ्या ८२ वर्षांच्या ‘जंगलमॅन’च्या डोळ्याची शस्त्रक्रिया एका निसर्गप्रेमी डॉक्टरने मंगळवारी मोफत केली. दरम्यान, या फाटक्या म्हाताऱ्यानं पुस्तकापलीकडचं ज्ञान देऊन जोडलेले ‘नातेवाईक’ त्याला भेटायला धावले आणि म्हाताऱ्याला रित्या हाती परत जाऊ द्यायचं नाही, असा निर्धार त्यांनी केला.जंगली श्वापदांना केवळ वासावरून ओळखणारे मालदेवचे शामराव कोकरे सोमवारी सातारच्या रस्त्यावर दिशाहीन फिरत असताना एका निसर्गप्रेमी मित्रानं त्यांना ओळखलं आणि इतर मित्रांना कळवलं. तीन दिवसांपासून उपाशी असणाऱ्या शामरावांना घरी नेऊन विचारपूस केली. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी ते आले असल्याची माहिती मिळताच डॉ. मिलिंद भाकरे यांनी तातडीनं त्यांच्या तपासण्या केल्या आणि मंगळवारी सकाळी यशस्वी शस्त्रक्रियाही केली. दरम्यान, या काळात ‘जंगलमॅन’ साताऱ्यात अवतरल्याची आणि त्याची सांपत्तिक स्थिती गंभीर असल्याची माहिती ‘लोकमत’च्या माध्यमातून असंख्य निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचली होती. भांडवल विकल्यामुळं आणि श्वापदांनी खाल्ल्यामुळं आता शामरावांकडे फक्त चार गुरं राहिली आहेत आणि अन्नान्नदशा होऊनही ते जंगलातच राहण्यावर ठाम आहेत, ही जिद्द त्यांना भावली.
कोयनेत फिरताना शामरावांचा पाहुणचार घेतला. त्यांच्याकडून जंगल समजून घेतले. आता त्यांच्यासाठी काही करण्याची वेळ आपली आहे, ही जबाबदारी सर्वांनी ओळखली. सोमवारी दुपारपासून फोनाफोनी करून अनेक निसर्गप्रेमींनी शामरावांची चौकशी केली होती. मंगळवारी शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना भेटायला अक्षरश: गर्दी लोटली. दरम्यान, त्यांना रिकाम्या हाती परत जाऊ द्यायचं नाही, असा निर्धार जंगलप्रेमींनी केला असून, त्या दृष्टीनं जमवाजमव सुरू केली आहे. काही दिवस आराम केल्यावर शामराव जंगलात परततील ते या ‘नातेवाइकां’चं भरीव प्रेम सोबत घेऊनच! (प्रतिनिधी)

सोशल मीडियावरून आवाहने
शामरावांंना साताऱ्यातून जाताना भरपूर धान्य, कपडे, वस्तू, पैसे सोबत घेऊनच पाठवायचं, हे निश्चित झालंय. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर अनेक ग्रुप्स असून, त्यावर यासंबंधीची आवाहने मंगळवारी दुपारपासून फिरू लागली आहेत. शामरावांना भेटायला येणारा कोणीही रिकाम्या हाती येत नाही. शिधा आणि सामग्री घेऊन डोंगरावरचं घर गाठणं ८२ वर्षांच्या शामरावांना अवघड जाणार आहे. त्यामुळं त्यांना सोडायला घरापर्यंत जायचं असंही काहींनी ठरवलंय.

Web Title: Jangalman eyes shine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.