जावळी प्रशासन झाले खडबडून जागे..!
By admin | Published: February 20, 2015 10:08 PM2015-02-20T22:08:45+5:302015-02-20T23:13:23+5:30
बहिष्कार प्रकरण : मरडमुरे गावात ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन; सखोल चौकशी होणार
कुडाळ : मरडमुरे (ता. जावळी) गावातील आढाव कुटुंबाला वाळीत टाकल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेतली. तहसीलदार रणजित देसाई यांनी पोलिसांना गावातील ग्रामस्थांकडून सविस्तर माहिती घेऊन या कुटुंबावर अन्याय झाला असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सामंजस्याने, शांततेत तोडगा काढून गावातील लोकांमधील समज-गैरसमज दूर करून शांतता टिकविण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.
तालुक्यातील सामाजिक संघटनांनी या प्रकाचा निषेध केला आहे. अन्यायग्रस्त कुटुंब भीतीखाली असल्यामुळे आतापर्यंत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे हे प्रकरण उजेडात आले. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मरडमुरे गावात शुकशुकाट जाणवला. ग्रामस्थ दबावाखाली जाणवले.
दरम्यान, तहसीलदारांनी मुंबई मंडळाला गावी बोलावून दोन दिवसांत बैठक बोलाविली आहे. त्यानुसार मेढा, कुडाळ पोलिसांना ग्रामस्थांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जर खरोखरच या कुटुंबावर अन्याय झाला असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. गावात समज-गैरसमज झाले असतील तर त्यासंदर्भात आम्ही ग्रामस्थांची बैठक घेणार आहोत. ग्रामस्थांमधील एकोपा कायम राहावा, शांतता-सुव्यवस्था राहावी या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यापुढे असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने पोलीस-जनतेतील सुसंवाद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- विवेक पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, मेढा
मरडमुरे येथे घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यापूर्वी या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कसलीही तक्रार दाखल केलेली नाही. तरीदेखील कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. गावात शांतता राहावी, ग्रामस्थांनी गावात यापुढेही एकत्रित वावरावे, यासाठी मुंबई मंडळ, ग्रामस्थांची एकत्रित बैठक दोन दिवसांत घेतली जाणार आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविला जाईल.
- रणजित देसाई, तहसीलदार, जावली
गावागावात सत्ता मुंबई मंडळांचीच!
जावली तालुका हा डोंगररांगांनी वेढलेला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे डोंगरमाथ्यावर वसली आहेत. या गावांमधील बहुतांश नागरिक नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. वर्षातून एकदा ग्रामदैवतांच्या यात्रेला ही मंडळी गावाकडे येतात. अशा गावांमध्ये मुंबईस्थित मंडळींचीच सत्ता पाहायला मिळते. त्यांचाच शब्द प्रमाण मानून गावचे राजकारण, समाजकारण चालते. गावात ग्रामपंचायत असली, तरी गावातील बहुतांश निर्णय मुंबई मंडळच घेते, असेच चित्र गावागावात पाहायला मिळते.
नोकरीनिमित्त मुंबईमध्ये राहणाऱ्या मंडळींकडून गावचा गावगाडा चालतो. कोणतीही निवडणूक असली तरी निर्णय मुंबईतच घेतला जातो. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत, गावचा सरपंच कशासाठी, असाच प्रश्न डोंगरमाथ्यावरील गावांत राहणाऱ्यांना पडल्याखेरीज राहत नाही. तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते. गावाच्या विरोधात विशेषत: या मुंबईकर मंडळींच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीविरोधात एखादा ग्रामस्थ गेल्यास त्याला वाळीत टाकण्यापर्यंत निर्णय घेण्याचे धाडस ही मंडळे करतात आणि त्यांचा निर्णय ग्रामस्थांना निमूटपणे ऐकावा लागतो.
मरडमुरा येथे घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. लोकशाही मानणाऱ्या देशात वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील, तर अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे, अशा तीव्र शब्तांत तालुक्यातील सामाजिक संघटनांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमावरून वृद्ध दाम्पत्यासह कुटुंबाला वाळीत टाकले जात असेल आणि पोलीस प्रशासनाला खबरही लागत नसेल, याचेच आश्चर्य नागरिकांना वाटू लागले आहे.