जावळीकरांना वेध लाल दिव्याचे..
By Admin | Published: March 5, 2017 11:24 PM2017-03-05T23:24:30+5:302017-03-05T23:24:30+5:30
शिवेंद्रसिंहराजे शब्द पाळणार : झेडपी अध्यक्षाच्या चर्चेत वसंत मानकुमरे यांचे नाव
मेढा : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळाले. यानंतर आता जावळीकरांना लाल दिव्याचे वेध लागले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवडणूक प्रचारात जावळीला लाल दिवा देणार, असा शब्द दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रुपाने जावळीला लाल दिवा मिळणार का? अन् वसंत ऋतूच्या आगमनाची निसर्गाला लागलेल्या चाहुलीबरोबरच जावळीत ‘वसंत बहरणार काय?,’ याबाबत तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मते राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकणार. राष्ट्रवादी काँग्रेस जावळीच्या पारड्यात काय देणार हा उत्सुकतेचा विषय आहे. वसंत मानकुमरे हे अध्यक्ष पदासाठीच्या शर्यतीत असणाऱ्यांपैकी एक असल्याने मानकुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
जावळीत जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व म्हणजे सहा जागांवर निर्विवाद वर्चस्व पदरात पाडून जावळी अन् राष्ट्रवादी हे असलेले समीकरण या निकालाने पूर्ण एकंदर सिद्ध झाले आहे. देशात अन् राज्यात भाजपाची लाट असताना देखील या लाटेत जावळीकरांनी राष्ट्रवादी वाहून न देता भाजपाची लाट थोपावली, हे मात्र खरे. विधानसभा निवडणुकीनंतर जावळीत मेढा नगरपंचायतीची निवडणूक झाली. अन् पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली. मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा लागलेला त्रिशंकू निकाल, राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले अमित कदम, राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील जावळीत झालेला संघर्ष, जावळी ही रणभूमी होणार काय? अशी झालेली परिस्थिती असून देखील जावळीकरांनी झालेल्या मतदानाच्या निम्मी म्हणजे ५० टक्के इतकी मते राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकल्याने जावळीत राष्ट्रवादी निर्विवाद आली अन् वर्चस्व कायम राखले.
जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेची कारकिर्द पाहिली तरीही सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेस असो व राष्ट्रवादी यांच्याच पारड्यात जावळीकरांनी भरभरून मते दिली आहेत. मात्र, आजपर्यंत जावळीच्या वाट्याला १९६२ ते २०१६ या ५५ वर्षांच्या कालखंडात केवळ दोनदाच ते देखील आरक्षणामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. यापैकी १९९८ ते १९९९ या एक वर्षाच्या कालावधीत जयसिंगराव फरांदे यांना व २००९ ते २०१२ या कालावधीत जिल्ह्यात एकमेव आरक्षण असल्यामुळेच ज्योती जाधव यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली. आरक्षणामुळे मिळालेले अध्यक्षपद वगळता जावळी तालुक्याला न मिळालेली संधी आता मिळणार काय? ही चर्चा सध्या जावळीत जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)