जावलीचा सुपुत्र अजिंक्य कांबळे बनला लष्करात लेफ्टनंट; वाहगावात आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 09:00 PM2023-06-11T21:00:45+5:302023-06-11T21:01:17+5:30
कमी वयात अधिकारी बनण्याची साधली किमया, पुणे येथील सरदार दस्तूर हरमोसदियार हायस्कूलमध्ये अजिंक्यने दहावीत ९४ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर एनडीएमध्ये प्रवेश घेण्याचा निश्चय केला.
कुडाळ : जावळी तालुक्यातील वहागाव येथील विश्वास कांबळे यांचा सुपुत्र अजिंक्य कांबळे याने एनडीएचे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून कमी वयात सैन्यदलात लेफ्टनंटपदी अधिकारी होण्याची किमया साधली. यामुळे जावळी तालुक्याची मान देशात उंचावली आहे.
एनडीएमध्ये प्रशिक्षण घेऊन सैन्यात अधिकारी होणारा अजिंक्य हा दुर्गम जावळी तालुक्यातील युवक आहे. निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह जावळी तालुक्याची मान देशात अभिमानाने उंचावली आहे. मायभूमी वहागाव येथे सरपंच संगीता शिराळे व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करून त्याचे स्वागत केले.
जावळी तालुक्यातील वहागाव मूळ गाव असणाऱ्या अजिंक्यचे कुटुंबीय सध्या मांजरी, पुणे येथे वास्तव्यास आहे. अजिंक्यने लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. अजिंक्यला त्याचे वडील विश्वास कांबळे आणि आई रेखा कांबळे यांनी पाठबळ दिले. मुलगा सैन्य दलात अधिकारी व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. अजिंक्यने खडतर कष्ट घेत आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली.
पुणे येथील सरदार दस्तूर हरमोसदियार हायस्कूलमध्ये अजिंक्यने दहावीत ९४ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर एनडीएमध्ये प्रवेश घेण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्याने छत्रपती संभाजीनगर येथील सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमधून एनडीए ट्रेनिंगचे प्राथमिक प्रशिक्षण देणारे दोन वर्षांचे प्रशिक्षण शालेय शिक्षणासह पूर्ण केले. त्यानंतर सर्व सोपस्कार पार करून त्याने मोठ्या जिद्दीने पुणे खडकवासला येथील एनडीए अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. याठिकाणी १४४ व्या तुकडीतून तीन वर्षांचे खडतर व आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण केले.
अजिंक्यला देशसेवेसाठी पाठवण्याची आमची इच्छा होती. त्याची जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने अथक प्रयत्नातून यश मिळाले आहे. लष्करात अधिकारी होऊन त्याने इच्छा पूर्ण केल्याचे समाधान वाटत आहे. याचा आम्हा सर्व कुटुंबीयांना अभिमान आहे. - रेखा कांबळे अजिंक्यची आई