जावळी तालुका कोरोनापासून सावरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:35+5:302021-05-20T04:41:35+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यात एप्रिल आणि मेच्या पंधरवड्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या काळजी वाढविणारी होती. अशातच बाधितांमध्ये अनेकांना प्राणही गमवावा ...
कुडाळ : जावळी तालुक्यात एप्रिल आणि मेच्या पंधरवड्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या काळजी वाढविणारी होती. अशातच बाधितांमध्ये अनेकांना प्राणही गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर सध्या तालुक्याची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेला महिना-दीड महिना वाढणाऱ्या कोरोनाच्या संख्येत घट होत आहे. यामुळे तालुका कोरोनापासून सावरू लागला आहे.
तालुक्यात दररोज शंभर ते दीडशेच्या सुमारास कोरोनाबाधितांचा आकडा वाढत होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ही संख्या कमी होताना दिसत आहे. १ मे १५ मे पर्यंत तालुक्यात १ हजार ४९० नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजअखेर तालुक्यात एकूण ६ हजार ९६१ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६ हजार १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील १८० रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाविरुद्ध साऱ्यांचीच अटीतटीची लढाई सुरू आहे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत.
सद्य:स्थितीत तालुक्यात ६३९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, उपचार घेत आहेत. बहुतांश कोरोनाबाधितांना शासकीय कोरोना सेंटरमध्येच उपचार मिळत आहेत. याकरिता १६५ बेडची व्यवस्था असून, ६० ऑक्सिजनयुक्त बेडही आहेत, अशी माहिती जावळी तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलनंतर सर्वच ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रभाव दिसून आला. यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. यामुळे कोरोनाच्या या महामारीतून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. याकरिता आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
चौकट : लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद
जावलीत नागरिकांचा लसीकरणास प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तालुक्यात ४५ वर्षांवरील सुमारे २० हजार २८१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ३६१ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणासाठी आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी योग्य नियोजन होत आहे. याबाबत प्रशासनाकडून नागरिकांनाही माहिती दिली जात आहे.