जावळीकरांना मिळतोय माणुसकीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:40 AM2021-05-06T04:40:54+5:302021-05-06T04:40:54+5:30
कुडाळ : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार नाहीसे झाले. घरातील कमावती मंडळी कोरोनाला बळी पडली. अशामुळे कुटुंबाची अवस्था फारच बिकट बनली. ...
कुडाळ : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार नाहीसे झाले. घरातील कमावती मंडळी कोरोनाला बळी पडली. अशामुळे कुटुंबाची अवस्था फारच बिकट बनली. काही कुटुंबात तर सर्वजण कोरोनाबाधित झाले. अशा परिस्थितीत जावळी तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांनी सामाजिकता जोपासत जावळीकरांना माणुसकीचा हात दिला आहे.
जावळी तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या संख्येने जनताही भयभीत आहे. लोकांची आर्थिक स्थिती आणि मानसिक स्थिती फारच बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत भागातील लोकांना मानसिक आधार आणि आर्थिक मदतीचा हात देण्याची महत्त्वाची भूमिका या रांजणे दाम्पत्याने निभावली आहे.
कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून सुमारे पाच हजार कुटुंबांना जीवनावशक वस्तूंचे वाटप केले. आर्थिक स्वरूपात मदत केली. तसेच अनेकांना इंजेक्शन्स व औषधे उपलब्ध करून देत आहेत. यांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले असून, २४ तास ही रुग्णवाहिका जावळीकरांच्या सेवेत असणार आहे. याशिवाय केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुमारे दोन लाख रुपये किमतीची औषधेही उपलब्ध करून दिली आहेत.
आजच्या या महामारीच्या काळात जावळीकरांसाठी एक देवदूत बनून ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व आणि माणुसकी जपली जात आहे. त्यांच्यासारख्या अशा दातृत्ववान मानसिकतेची भावना समाजात रुजवण्याची आजच्या परिस्थितीत खरी गरज आहे.
०५कुडाळ
फोटो:
सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून जावळीकरांसाठी सेवेत मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.