Satara: मांडवे येथील जवान ज्ञानेश्वर खाडे शहीद, गावावर शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:29 PM2024-06-21T13:29:37+5:302024-06-21T13:29:45+5:30

‘शहीद वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणला

Jawan Dnyaneshwar Khade martyred in Mandwe satara | Satara: मांडवे येथील जवान ज्ञानेश्वर खाडे शहीद, गावावर शोककळा 

Satara: मांडवे येथील जवान ज्ञानेश्वर खाडे शहीद, गावावर शोककळा 

वडूज : मांडवे, ता. खटाव येथील वीर जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे (वय २९) यांना जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे वीर मरण आल्याची माहिती समजताच मांडवे गावावर शोककळा पसरली. शहीद वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अमर रहेच्या जयघोषात रात्री उशिरा शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पै. हनुमंत खाडे यांचे सुपुत्र जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे हे २०१६ रोजी २४ मराठा बटालियनमध्ये भरती झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मांडवे येथे , माध्यमिक शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, तर महाविद्यालयीन शिक्षण दहिवडी येथे झाले. त्यांना कुस्ती व सांप्रदाय क्षेत्राची फार आवड होती. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

सध्या ते मराठा बटालियनमधील ४१ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे त्यांना वीरमरण आले. गुरुवार, दि. २० रोजी सकाळी त्यांच्या कुटुंबाला ते मरण पावल्याची माहिती समजली. ही माहिती समजताच कुटुंबासह मांडवे गावावर शोककळा पसरली. शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी श्रीनगरमधून दिल्ली येथे त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पुणे येथे आणण्यात आला. यावेळी पुणे विमानतळावर सन्मान परेड पार पडली. 

पुणे येथून ॲम्बुलन्सद्वारे त्यांचा मृतदेह मांडवे येथे त्यांच्या मूळगावी रात्री उशिरा आणण्यात आला. याप्रसंगी मांडवे गावातील सार्वजनिक मंडळे, ग्रामस्थांनी फुलाने सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांची अंत्ययात्रा काढली. यावेळी ''वीर जवान ज्ञानेश्वर अमर रहे''च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मांडवे गावातून निघालेली ही अंत्ययात्रा आंबेमळा वस्ती येथे आली. त्यानंतर शहीद जवान ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्यांच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण व लहान बंधू असा परिवार आहे.

Web Title: Jawan Dnyaneshwar Khade martyred in Mandwe satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.