जवान थेट एटीएममध्ये... पोलिस मात्र रांगेत !

By admin | Published: November 16, 2016 11:10 PM2016-11-16T23:10:15+5:302016-11-16T23:10:15+5:30

सातारकरांची अनोखी शिस्त : नोटा बदलून घेताना दिसतोय नागरिकांच्या मानसिकतेचा अनोखा आविष्कार

Jawans live at the ATM ... police queue! | जवान थेट एटीएममध्ये... पोलिस मात्र रांगेत !

जवान थेट एटीएममध्ये... पोलिस मात्र रांगेत !

Next

सातारा : कोणी ‘व्हिआयपी’ व्यक्ती असेल तरी त्यांनी रांगेत उभे राहूनच इतरांप्रमाणे कामे करावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र काहीजण रांगा तोडण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण रांगेत उभे राहून आपण सर्वसामान्यच आहोत, हे दाखवून देतात, असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील एटीएम सेंटरमध्ये पाहायला मिळाला.
एका जवानाला ड्युटीवर जायचे होते म्हणून त्या जवानाने रांगेत उभ्या राहिलेल्या नागरिकांना मी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाऊ का, अशी विनंती केली. भल्या मोठ्या रांगेत उभ्या राहिलेल्या सगळ्यांनीच त्या जवानाला एका सुरात हो म्हणून पैसे काढण्यास मुभा दिली. मात्र दुसऱ्या एटीएममध्ये पैसे काढताना एका पोलिसाला या उलट अनुभव आला. मी पोलिस आहे. आत्ताच नाईट ड्युटी करून आलोय. मला पैसे काढण्यासाठी जाऊद्या, अशी विनंती पोलिसाने केली. या ठिकाणी मात्र नागरिकांनी पोलिसाला एटीएममध्ये जाऊ न देता रांगेत उभे केले. या परस्पर घटनांमधून जवानांबाबत सर्वसामान्यांच्या मनात सहानुभूती तर पोलिसांच्याविषयी कुठेतरी राग व्यक्त होत असल्याचे दिसून आले.
प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी सकाळपासून लोकांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी एक युवक धापा टाकतच एटीएम सेंटरजवळ आला. भली मोठी रांग पाहून त्याचा चेहरा नर्व्हस झाला. मात्र त्याने मी सैन्य दलात असून मला ड्युटीवर जायचे आहे, अशी एका व्यक्तीला त्याने विनंती केली. त्या व्यक्तीने मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मागे रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांना विचारा, असा सल्ला दिला. त्यानंतर त्या जवानाने रांगेतील सर्व लोकांनाही अशीच विनंती केली. त्याच्या विनंतीला तत्काळ सर्व नागरिकांनी होकार दिला. त्या जवानाने एटीएम सेंटरमधून पैसे काढून बाहेर आल्यानंतर जाताना त्याने रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांना सलाम ठोकून आभार व्यक्त केले. सैन्य दलातील जवानांविषयी सर्वसामान्य नगरिकांच्या मनात नेहमीच आदराची भावना आणि कुतूहल असते. त्यामुळे या जवानाला लाईन तोडून पैसे काढण्यास नागरिकांनी मुभा दिली. परंतु पोलिसांना मात्र याउलट वेगळचा अनुभव समाजात येत आहे. (प्रतिनिधी)
पोलिसदादा सांगतोय ड्यूटीचे कारण...
क्रीडा संकुलातील एका एटीएम सेंटरमध्येही पैसे काढण्यासाठी नगरिकांची बुधवारी भली मोठी लाईन लागली होती. ऐन थंडीतही नागरिक लाईमध्ये उभे राहून अक्षरश: घामाघूम झाले होते. यावेळी एका पोलिसाचा पैसे काढण्यास जाण्यासाठी नंबर आला होता. त्यामुळे त्याने मागे रांगेत उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्याला पुढे बोलावून घेतले. दोघे पोलिस एटीएम सेंटरच्या दरवाजाजवळ उभे राहिले. दोघेही बऱ्यापैकी वयस्कर होते. हा पोलिस लाईन तोडून पुढे आल्याने नागरिकांमध्ये कुजबुज वाढली. त्यामुळे त्या पोलिसाने ‘मी आताच ड्युटीवरून आलोय. मला पैसे काढू द्या,’ अशी विनंती केली. मात्र नागरिकांनी त्याचे काहीही ऐकले नाही. रांगेत उभे राहूनच तुम्ही पैसे काढा, असा नागरिकांनी आग्रह धरला. नाईलाजाने त्या पोलिसाला एटीएम सेंटरच्या दरवाजापासून परत माघारी येऊन रांगेत उभे राहावे लागले.
 

Web Title: Jawans live at the ATM ... police queue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.