जे नसे ललाटी.. ..ते करी तलाठी!
By Admin | Published: March 25, 2015 10:49 PM2015-03-25T22:49:25+5:302015-03-26T00:06:36+5:30
सालपेतील प्रकार : चक्क सातबाऱ्याहून शेतकऱ्याची विहीर गायब
आदर्की : फलटण पश्चिम भागातील सालपे येथील शेतकरी मनोहर शिंदे यांच्या हिश्याची बारा आणे विहीर सातबारा उताऱ्यावरून गायब झाल्याने ‘जे नसे ललाठी ते करी तलाठी’ करीत असल्याचा अनुभव संगणक युगातही शेतकऱ्याला आला आहे.
सालपे, ता. फलटण येथील गट नं. २७० मध्ये विहीर व विहिरीवर वडिलापार्जित विद्युत पंप आहे. काही दिवसांपूर्वी त्या जमिनीचा उतारा काढण्यासाठी मनोहर शिंदे तलाठ्याकडे गेले. तलाठ्यांनी उतारा दिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. १६ आणे विहिरीतील १२ आणे हिस्सा गायब झाल्याचे त्यांना समजले. सुरेश शिंदे यांच्या नावावर केवळ आता चार आणे हिस्सा राहिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी फेरफार ही काढला. त्यामध्येही १२ आणे हिस्सा व नावाला कंस केला असल्याचे दिसून येत आहे.फेरफारवर १९८३ मध्ये बँकेचे कर्ज काढले. ते फेडले त्याचा बोजा कमी करण्यासाठी जमिनीवरील बोजा कमी करणारे पत्र दिले. त्या बँकेचा बोजा कमी केल्याचा फेरफार आहे.असे असताना विहिरीचा १२ आणे हिस्सा गायब कसा झाला. कोणतीही चूक नसताना तलाठ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता अर्ज करा, मी त्यावेळी नव्हतो, अशी उडवाउडवीची उत्तर देत आहेत. असे शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
मनोहर शिंदे यांचे नाव सातबाऱ्यावरून काढताना २००० मध्ये कंस झाला आहे. मी त्यावेळी सालपे येथे कार्यरत नव्हतो. त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज केल्यास दुरुस्त करून देऊ.
- अडसूळ, सालपे तलाठी
मला प्रकार माहीत नाही. त्यांनी रितसर अर्ज केल्यास फेरफार पाहून चूक दुरुस्त करण्यात येईल.
- जोशी, मंडल अधिकारी, तरडगाव