ढोल बजने लगा, रंग भरने लगा...; बावनकुळेंसह जयाभाऊ, अतुलबाबांनी धरला गजी नृत्यावर ठेका!
By प्रमोद सुकरे | Published: November 13, 2022 12:36 PM2022-11-13T12:36:44+5:302022-11-13T12:46:22+5:30
कराड तालुका हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो.
कराड : राजकारणात मतांसाठी नेते काय करतील किंवा त्यांना काय करावे लागेल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्येक शुक्रवारी नांदगाव येथे आला. भाजपने आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात चक्क नेत्यांनी गळ्यात ढोल अडकवत ते वाजवत गजी नृत्यावर ठेका धरला. त्यामुळे कराड दक्षिणेत आत्तापासूनच विधानसभेचा ढोल वाजू लागला आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नांदगाव (ता. कराड) येथे शुक्रवारी पैलवान धनाजी पाटील यांनी कराड दक्षिण भाजपच्या वतीने धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता. सायंकाळी ६ वाजल्यापासूनच तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तेथे मोठी गर्दी केली होती. प्रवेशद्वारावर धनगर बांधव ढोल वाजवत पाहुण्यांची वाट पहात होते. पण रात्री ९:१५ च्या सुमारास भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवर नेते आले. मान्यवरांना उशीर होऊनही धनगर बांधवांचा उत्साह कमी झाला नव्हता .ते पाहून नेत्यांनीही आपल्या गळ्यात त्यातील ढोल घेत ते वाजवत गजी नृत्यावर ठेका धरला. त्यावेळी धनगर बांधवांना त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
कराड तालुका हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथल्या राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी डॉ. अतुल भोसले यांनी दोन वेळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मात्र त्यांना यशाने हुलकावणी दिली. आता मात्र यावेळी यश खेचून आणायचे या दृष्टीने भाजप कामाला लागले आहे. निवडणूक २ वर्षांवर आहे मात्र आत्तापासूनच मतदार संघात वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नांदगावला हा धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यात डॉ. अतुल भोसलेंनीही ढोल वाजवला. आता ते विधानसभेला विजयाचा ढोल वाजवणार का? हे पहावे लागेल.
काठी न घोंगड घेऊ द्या की रं ...
या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना धनगर समाजाच्या वतीने काठी अन घोंगडे देऊन स्वागत करण्यात आले .आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. अतुल भोसले, आमदार जयकुमार गोरे यांना काठी आणि घोंगडं दिल्यानंतर त्याची छबी टिपण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
बावनकुळेंनी टाकलं जाळं ...
सायंकाळी ६ वाजता प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कराड येथील भोई समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. मासेमारी व्यवसाय असणार्या या समाज बांधवांनी यावेळी त्यांच्यासमोर आपले अनेक प्रश्न मांडले. ते प्रश्न नक्की सोडवू असा विश्वास या बांधवांना देत बावनकुळेंनी त्यांच्यावर जणू जाळेच टाकलं. त्याचीही शहरात चर्चा आहे.
रात्री १२ पर्यंत चालली कोअर कमिटी बैठक
शुक्रवारी दिवसभर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले. या दौऱ्यात जिल्हास्तरीय कोअर कमिटीच्या बैठकीला उशीर झाला. मग रात्री नांदगावचा कार्यक्रम संपल्यानंतर १०:३० वाजता ओंड येथील एका कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर ,अँड.भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .रात्री १२ वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होती.आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचीही सर्वांना उत्सुकता आहे.