जयकुमार-आनंदराव म्हणतात...बाबा म्हणतील तसं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 08:03 PM2017-07-19T20:03:24+5:302017-07-19T20:04:25+5:30
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरुन शाब्दिक लढाईला थोडी बगल देत आमदार जयकुमार गोरे व आमदार आनंदराव पाटील बुधवारी पक्षनिरीक्षकांनी आयोजित केलेल्या बैठकीच्या
ऑनलाइन लोकमत
सातारा : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरुन शाब्दिक लढाईला थोडी बगल देत आमदार जयकुमार गोरे व आमदार आनंदराव पाटील बुधवारी पक्षनिरीक्षकांनी आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने जिल्हा काँगे्रस कमिटीत एकत्र आले. जिल्हाध्यक्ष निवडण्याच्या अनुषंगाने पृथ्वीराजबाबा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे, असे दोघांनीही यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने पूर्व तयारीसाठी काँगे्रसचे झारखंड राज्यातून आलेले पक्षनिरीक्षक झाकिर पठाण, कोल्हापूरचे तौफिक मुलाणी यांनी बुधवारी काँगे्रस कमिटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, धैर्यशील कदम, मोहनराव भोसले, किरण बर्गे, रजनी पवार, जयकुमार शिंदे, युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, अशोकराव जाधव, सर्जेराव जांभळे, सतीश भोसले, रोहिणी निंबाळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान यांची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष निवडीवरुन जिल्हा काँगे्रसमध्ये अनेक दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरु आहे. आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, किरण बर्गे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्याआधी माजी वनमंत्री खासदार पतंगराव कदम यांनी भुर्इंज येथील कार्यक्रमामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे काँगे्रसचे नेतृत्व दिले गेले पाहिजे, अशी इचच्छा व्यक्त केली होती. नुकतीच किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे आपल्या निवासस्थानी व्यक्त केली होती. आमदार आनंदराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कडाडून टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर साताऱ्यात येणाऱ्या पक्षनिरीक्षकांच्या दौऱ्याकडे काँगे्रसजणांचे लक्ष लागून राहिले होते. काँगे्रस कमिटीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आमदार आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे यांनी आमले नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण असल्याने ते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे पक्षनिरीक्षकांसमोर सांगून टाकले. यावेळी पक्षनिरीक्षक झाकीर पठाण यांनी जिल्हाध्यक्ष व जिल्ह्यातील ८ ब्लॉकमधून प्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत. सर्वप्रथम ब्लॉकचे प्रतिनिधी निवडले जातील. त्यानंतर हेच निवडून आलेले लोक जिल्हाध्यक्षपदासाठी मतदान करतील, तसेच तालुकाध्यक्षांची मतेही जाणून घेण्यात येणार असून त्यासाठी झाकिर पठाण बुधवार व गुरुवार दोन दिवस साताऱ्यात थांबणार आहेत.
माझा कुणाशीही मतभेद नाही. मी काय ताम्रपट घेऊन आलेलो नाही. बाबा ज्याला संधी देतील, त्याच्या पाठीशी आम्ही राहू.
- आमदार आनंदराव पाटील
जिल्हाध्यक्षपदासाठी कुणीही इच्छुक असू शकते, त्यात काही गैर नाही. बाबांचे नेतृत्व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ते ज्यांना संधी देतील, त्याला पाठिंबा राहिल.
- आमदार जयकुमार गोरे